देवकरांना तात्पुरता दिलासा : सर्वोच्च न्यायालयात होणार २२ रोजी सुनावणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत दाखल याचिकेवर आता दि.२२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना दिलासा मिळाला असून त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवार दि.१५ रोजी निर्णय होणार होता. परंतू न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या याचिकेवर आज (दि.१८) रोजी निर्णय होणार होता. परंतू न्यायालयाने सुनावणीसाठी २२ नोव्हेंबरची तारीख दिली.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर दि.२२ रोजी मतमोजणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काहीही आला तरी देवकर यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे.