जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३ । कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फैजपूर (ता.यावल) परिसरातील केळी पिकावरील कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) बाधीत क्षेत्राची आज पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली व सी. एम. व्ही. चे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.
हंबर्डी गावातील शेतकरी विलास चुडामण पाटील, न्हावी येथील शेतकरी सागर निळकंळ फिरके, श्रीमती निर्मला निळकंठ फिरके व आमोदा येथील शेतकरी दिलीप लिलाधर कोल्हे यांच्या केळी पिकाखालील बाधीत क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
या क्षेत्रभेटी वेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझिरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावल तालुका कृषी अधिकारी बी. व्ही. वारे, फैजपूर मंडळ कृषी अधिकारी सागर सिनारे, कृषी व महसूल विभागातील सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
केळी उत्पादक निर्यातदारांसाठी परिसंवाद – कृषी मित्र स्वर्गीय हरीभाऊ जावळे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त केळी उत्पादक आणि केळी निर्यातीसाठी इच्छुक शेतकरी व उद्योन्मुख उद्योजकांसाठी फैजपूर येथे आयोजित परिसंवादाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी केळीचे अन्नद्रव्य आणि करपा, पिटिंग व सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसिध्द केळी निर्यातदार किरण ढोके यांनी केळी उत्पादक ते केळी निर्यातदार यशस्वी वाटचालीविषयी अनुभव सांगितले. युवा केळी निर्यातदार बलरामसिंग सोळंके यांनी केळी निर्यातीसाठी आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र तसेच आयात, निर्यात प्रक्रिया बँक हमी आणि जागतिक व्यापार याबाबत मार्गदर्शन केले.