⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

लोकसभा निवडणूक : जळगावच्या उमेदवारांना या गोष्टीचे टेन्शन

जळगाव लाईव्ह न्यूज : २१ मार्च २०२४ : जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात उन्हासोबत राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. महायुतीकडून जळगावमध्ये भाजपाच्या माजी आमदार स्मिताताई वाघ तर रावेर मधून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कुणाला रिंगणात उतरवायचे ? यावर अजूनही एकमत होत नसल्याने अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. मात्र जिल्ह्यातील उमेदवारांसमोर एका वेगळ्याच गोष्टीचे टेन्शन राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असली तरी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया जवळपास महिन्यानंतर म्हणजेच १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघे आठ दिवस म्हणजेच २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ दिला जाईल. २६ एप्रिलला छाननी तर २९ एप्रिलला माघारी होईल. माघारीनंतर अवघे १३ दिवस प्रचाराला मिळणार आहेत. यामुळे उमेदवारांना दोन गोष्टींचे टेन्शन सतावणार आहे.

२५ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याचा मोठा कालवधी असल्याने याकाळात ऐनवेळी उमेदवार बदलण्याची भीती असणार आहे. कारण विरोधकांसह स्वपक्षातील इच्छूकांकडून उमेदवार बदलाच्या चर्चा व अफवांना हवा दिली जाते. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबद्दल विश्वासहार्यता राहत नाही. दुसरे टेन्शन म्हणजे माघारीनंतर जेंव्हा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होते तेंव्हा उमेदवारांना प्रचारसाठी अवघे १३ दिवस मिळणार आहेत.

३७ लाख ९३ हजार ४२३ मतदार

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील मतदार संख्या आता ३७ लाख ९३ हजार ४२३ मतदार आहेत. पुरुष मतदार १९ लाख ६८ हजार ११४ तर महिला मतदार १८ लाख २५ हजार ७२, तृतीय पंथीय १३७ आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघात १९ लाख, ८१ हजार ४७२ तर रावेर लोकसभा मतदार संघात १८ लाख ११ हजार ९५१ इतक्या मतदारांची नोंद आहे.