⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Jalgaon: अत्यंत दुर्दैवी.. अन् मुलाच्या डोळ्यासमोर आईने प्राण सोडला, नेमकं काय घडलं??

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२३ । महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच अपघाताची एक धक्कादायक घटना घडलीय. जळगाव-भुसावळ महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ दुचाकीवर असलेल्या माय-लेकाचा भीषण अपघात झाला. या अपघातात मुलाच्या डोळ्यासमोर त्याच्या आईने प्राण सोडला.

शिला हिरामण राठोड (वय ५१, रा. फॉरेस्ट कॉलनी, जळगाव) असं मयत महिलेचं नाव असून या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
शिला राठोड या फॉरेस्ट कॉलनी येथे कुटुंबासह वास्तव्यास असून त्या मंगळवारी त्यांचा मुलगा तुषार हिरामण राठोड (वय २३) याच्यासोबत दुचाकीने खासगी कामानिमित्त भुसावळ येथे गेल्या होत्या. काम आटोपून दोन्ही माय-लेक हे रात्री दुचाकीने पुन्हा जळगावला घराकडे परतत होते. मात्र यादरम्यान, तरसोद फाट्याजवळ काम सुरु असून रात्रीच्या काळोखात खडीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने तरुणाची दुचाकी या ढिगाऱ्यावर आदळली.

अपघाता घटनेत दोन्ही माय-लेक रस्त्यावर फेकले गेले. शिला राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलगा तुषार राठोड याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, महामार्गाचे काम सुरु आहे. किमान ज्या ठिकाणी मातीचे ढिगारे अथवा खडीचे ढिगारे केले आहे, त्याठिकाणी लाईटची व्यवस्था असावी किंवा दिशादर्शक फलक असावे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाहक निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महामार्गावर सर्व ठिकाणी पथदिवे तसेच ज्या ठिकाणी कामे सुरु आहेत, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.