⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आ. तांबेंनी दिले महापौरांना बक्षिस : वाचा काय आहे प्रकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ ।  दोन महिन्यांपूर्वी नाशिक पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिदेशी निवडणुक पार पडली. यावेळी कोण कोणासोबत आहे? हा चर्चेचा मुद्दा ठरला होता.मात्र ठाकरे गटाचे उमेदवार असतानाही आमदार सत्यजित तांबेंना महापौर जयश्री महाजन यांनी मदत केली होती. पर्यायी केलेल्या मदतीचे बक्षीस महापौर जयश्री महाजन यांना मिळाले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेसाठी महापौरांच्या मागणीनुसार शहरासाठी एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.(satyajit tambe in jalgaon)

महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांच्या शहर व तालुक्यात शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पदवीधरांच्या मतदानासाठी महाजन दांपत्याची मदत उमेदवारांना घ्यावी लागते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार असतानाही महापौर महाजन यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना सहकार्य केले होते.आणि तांबे यांचा विजय झाला होता.

विजयानंतर आमदार तांबे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. मेहरूण येथील निवासस्थानी त्यांनी महापौर व विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली होती. महापौरांनी शहरातील गरीब मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांच्यासाठी मनपाची अभ्यासिका उभारण्याचा मानस व्यक्त केला. मनपाची आर्थिक बाजू भक्कम नसल्याने शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार तांबे यांच्याकडे केली होती.

त्यानंतर २९ मार्च रोजी शासन आदेश जारी झाला आहे. त्यात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेत जळगाव मनपाला युवक माहिती केंद्र, अभ्यासिका बांधकाम, डिजिटलायझेशन करणे या कामांसाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. विरोधी पक्षनेता महाजन यांनीही आमदार तांबे- यांच्याकडे मागणी केल्याने त्याची पूर्तता झाल्याचे त्यांनी सांगितले.