जळगाव लाईव्ह न्यूज । मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून अलीकडेच महाराष्ट्रातील सर्व सरकारी, निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तरी देखील मराठीमध्ये संवाद साधण्यास नकार देताना बिगरमराठी अधिकारी, व्यक्तींकडून मुजोरपणा दाखवला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच मुंबईतील उल्हासनगर रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्ते, परप्रांतीय प्रवासी आणि रेल्वेचे आरपीएफ जवान यांच्यामध्ये मराठी बोलण्यावर हमरीतुमरी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानकावर बाहेरच्या राज्यातील नागरिकांना तिकीट घेण्यासाठी टोकन सिस्टम सुरू केल्याचा आरोप मनसेने केला. या मुद्द्यावरून मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन जाब विचारला. त्यावेळी एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली, ज्यावरून ‘मराठीत बोला’ असं सचिन कदम यांनी म्हटले. जवानाने मात्र मुजोरीच्या स्वरात “मराठी येत नाही” असे सांगितले आणि “तुमची तक्रार डीआरएमकडे करणार असल्याचे सांगताच जा, माझी तक्रार करा” असे आव्हान दिले.
या वादावादीत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मराठी भाषिक आरपीएफ अधिकाऱ्यानेदेखील मनसे कार्यकर्त्यांना “तुम्हाला हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला” असा अजब सल्ला दिला. मनसे नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, या अधिकाऱ्याने मराठीला कधी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असा उलटसवाल केला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे.