⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा ‘असा’ घ्या लाभ!

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी लागू केली होती. परंतु, आता या योजनेत नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे, दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे.

कुटुंब नियोजनानंतर सरकारकडून एका मुलीच्या नावे 50,000 रुपये किंवा दुसर्‍या मुलीच्या जन्मानंतर 25,000-25,000 रुपये बँकेत जमा होणार आहेत. मात्र, या योजनेत आता काहीअंशी बदल करण्यात आलेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात ‘सुकन्या’ योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेचा उद्देश
‘सुकन्या’ योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेत करण्यात आल्यामुळे ‘सुकन्या’ योजनेच्या सर्व अटी व शर्ती ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेमध्ये लागू करण्यात आले.

योजनेच्या प्रमुख अटी
मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक.
कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी 1 वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक.
कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक.
एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
सदर योजनेचा लाभ ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.
ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे.
जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी 6 वर्षांची झाल्यावर काढता येईल. त्यांनतर पुन्हा मुलगी 12 वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे-मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल. (मुलगी दहावी उत्तीर्ण व अविवाहित असावी)
या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल.
दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक, उत्पन्नाचा दाखल, रहिवासी दाखल, मुलीचा जन्मदाखला पासपोर्ट साइज फोटो.

अर्ज करण्याची पध्दत

सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

योजनेची अधिक माहिती ‘येथे’ उपलब्ध
या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

महत्वाचे : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.