जामनेरगुन्हे

जामनेरमध्ये प्रशासनाची धडक कारवाई; ६७ गोवंशीय जनावरांची सुटका, ५ गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील अवैध कत्तलखाने, गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तलीविरोधात पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी आणि धडक मोहीम राबवली आहे. या विशेष मोहिमेत तब्बल ६७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची अंदाजे किंमत ६ लाख १० हजार रुपये असून त्यांना जळगाव येथील गोशाळेत सुरक्षितरित्या रवाना करण्यात आले आहे.

gat

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहेम, पोलीस निरीक्षक मुल्लीराम कसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल शिंदे, अशोक कोकाटे यांच्यासह विविध पोलिस पथकांनी यात सहभाग घेतला. नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही कारवाईत सहकार्य केले.

शासनाच्या निर्देशानुसार गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध भागांत गुप्त माहितीच्या आधारे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी घोडे पीर बाबा दर्गा परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा, पहूर गल्ली भागात संयुक्त पथकाने अचानक छापेमार कारवाई केली.

तपासणीदरम्यान एकूण ६७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत सुमारे ६ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. कारवाईदरम्यान एका ठिकाणी गोवंशीय मांसही आढळून आले. सर्व जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव येथील गोशाळेत हलविण्यात आली आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संबंधित आरोपींविरोधात पुढील तपास सुरू आहे.

जामनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अवैध वाहतूक, अवैध कत्तल किंवा अनधिकृत कत्तलखान्यांविषयी माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button