जळगाव जिल्हा

स्वयंपाकघरावर थेट युद्धाची झळ; जळगावात खाद्यतेलाचे दर उसळले, डब्ब्यामागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ?

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाची झळ महाराष्ट्रासह देशाला लागण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून त्यात आता गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिक चिंतेत आहेत. अशातच युद्धामुळे आयातीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

oil jpg webp

जळगाव जिल्ह्यात सध्या खाद्यतेलाच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट ढवळून काढले आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असून व्यापाऱ्यांनुसार आयातीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता ही या वाढीमागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या बाजारात सोयाबीन तेलाच्या १५ लिटरच्या डब्ब्याची किंमत २३०० रुपयांवरून थेट २३७५ ते २४५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर शेंगदाणा तेलाच्या दरातही मोठी वाढ झाली असून हा डब्बा २६०० ते २७०० रुपयांपर्यंत गेला आहे. सनफ्लॉवर तेलाच्या दरातही वाढ होत २४०० रुपयांवरून २४७० ते २५०० रुपये इतकी किंमत झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधून होणाऱ्या खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम बाजारातील दरांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या बाजारात उपलब्ध असलेला जुना साठा असल्यामुळे दर काही प्रमाणात नियंत्रणात आहेत. मात्र भविष्यात आयात कमी झाली किंवा साठेबाजी वाढली तर खाद्यतेलाच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सरकारने साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत आणि जागतिक परिस्थिती तणावपूर्ण राहिली तर येत्या काळात खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती बजेट मोठ्या प्रमाणावर बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button