जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाला यश आले आहे. यावेळी टाकण्यात आलेल्या छाप्यात कंपनीत ३६ लाखांचा बायोडिझेलसदृश साठा आढळळा असून टँकर ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि ऑईल माफियांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत असे की, भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट नंबर F-50/51 वरील ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तेथे एक टँकर उभा असून त्यात डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्याची खबर मिळताच यंत्रणा कामाला लागली. तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष रविवारी कंपनीच्या आवारात धडक दिली.

या कारवाईदरम्यान कंपनीच्या आवारात उभ्या असलेल्या जी.जे. २४ – व्ही. ७६५५ (GJ 24 V 7655) क्रमांकाच्या टँकरमध्ये सुमारे ३० हजार लिटर बायोडिझेल सदृश द्रवाचा साठा केल्याचे निदर्शनास आले. टँकरमधील द्रव पदार्थाची घनता ७१२ इतकी असून तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हा द्रव पदार्थ बायोडिझेल आहे किंवा अन्य इंधन? याची खात्री करण्यासाठी नमुने घेतले आहेत. त्यांची रासायनिक तपासणी दरम्यान, कंपनी मालकांच्या नातेवाइकांनी हा टँकर भाडेतत्त्वावर घेतल्याचे सांगितले. मात्र, कारवाई झाली तेव्हा टँकर चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता.
या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन (७० रुपये प्रति लिटर दराने) असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा टँकर आता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला आहे.









