जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेरच्या सुपारी बाग परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मृत तरुणाचे नाव आहे. रितेशचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत सध्या तर्कवितर्क लढवले जात असून कुटुंबीयांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा मंगळवारी संध्याकाळपासून घरातून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला. मात्र आज बुधवारी (दि २७ मे) सकाळी सुपारी बाग परिसरातील निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली.

घटनेनंतर नातेवाईक आणि मित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवला. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूपूर्वी रितेशने मद्यप्राशन केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
रितेशच्या पश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार असून त्याचे कोणाशीही वैर नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.











