⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

महापौरांची सरप्राईज भेट, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी । शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून मंगळवार महापौर जयश्री महाजन यांनी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी केली. निविदेत नमूद केलेल्या तरतूदीपेक्षा मक्तेदाराने चांगलेच काम केलेले आढळून आले. मनपा प्रशासनाने त्रयस्थ अभियंत्याकडून देखील परीक्षण करून घेतले.

जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली होती. मनपा प्रशासनाने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अभियंत्यांकडून कामाची तपासणी करून घेतली आहे.

कामाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी अचानक पाहणी केली. रस्त्यांची कामे करताना निविदेत केलेल्या तरतुदीनुसार रस्त्याचा बीएम ५० मिमी जाडीचा तर त्यावरील कार्पेटचा थर २० मिमीचा असणे आवश्यक होते. महापौर जयश्री महाजन यांनी मनपा अधिकाऱ्यांसह तपासणी केली असता मक्तेदार प्रतिनिधीने ठिकठिकाणी रस्ते मोजून दाखविले. निविदेत २० मिमीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात रोलिंग केल्यावर देखील २४ ते २५ मिमीचा थर आढळून आल्याने महापौरांनी समाधान व्यक्त केले.

महापौर जयश्री महाजन यांच्या अचानक भेटीमुळे सर्वच अवाक झाले असून कामाची गुणवत्ता देखील चांगली आढळून आली आहे. शहरातील मुख्य रस्ते होणार असल्याने जळगावकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.