⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

बंडखोरांना दिलासा : सुप्रीम कोर्टाने दिला उपाध्यक्षांना ५ दिवसांचा वेळ तर बंडखोरांना मिळाली १२ जुलैपर्यंतची मुदत!

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिस विरोधात एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सोमवारी दुपारी सुप्रीम कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला असून अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलेल्या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी १२जुलैपर्यंत सायकांळी ५.३० वाजेपर्यंतचा वेळ मिळाला आहे. तसेच पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार असून विधानसभेच्या उपाध्यक्षांना न्यायालयाने नोटीस बजावली ५ दिवसात त्यांना आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे ३९ आमदार घेऊन बाहेर पडले आहे. एकनाथ शिंदे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील १६ आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. आमदारांच्या घरावर देखील नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस मिळाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाने नोटीसला आव्हान देण्याचा निर्णय घेतला.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दुपारी सुनावणी पार पडली असून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेत न्यायालयाकडून शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत अपात्र ठरविता येणार नसून आमदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी दि.१२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत आपले उत्तर लेखी सादर करता येणार आहे. न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस बजावली असून त्यांना अविश्वास आणि संपूर्ण प्रकरणाबाबत ५ दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. न्यायायालयाच्या निर्णयाने एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून मविआला मोठा झटका मानला जात आहे.

कोण आहेत 16 आमदार ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय?
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
13) सदा सरवणकर
14) प्रकाश आबिटकर
15) संजय रायमूलकर
16) रमेश बोरनारे