मुलाला उठविण्यासाठी दरवाजा उघडला अन्.. समोरचं दृश्य पाहून वडिलांना बसला धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । बाजूच्या खोलीत झोपण्यासाठी जात असल्याचे सांगून राहुल लोटन पाटील (२८, रा. पिंप्राळा) या तरूणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यात उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नसून याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल पाटील हा आई-वडील, दोन भावांसह पिंप्राळ्यात वास्तव्यास होता. मंगळवारी दुपारी जेवणासाठी तो कामावरून घरी आला. जेवण झाल्यानंतर बाजूच्या खोलीत झोपण्यासाठी जात असल्याचे त्याने वडीलांना सांगितले. त्यानंतर त्याने ओढणीच्या सहाय्याने खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्या.

गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला मुलाचा मृतदेह
पुन्हा ड्युटीवर जायचे की नाही म्हणून मुलाला उठविण्यासाठी वडीलांनी बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला अन् त्यांचा धक्काच बसला. समोर त्यांना मुलगा राहुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना रहिवाश्यांना कळताच त्यांनी रामानंदनगर पोलिसांना संपर्क साधला. रामानंदनगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले, एएसआय संजय चौधरी, उमेश पवार, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी गाठून मृतदेह खाली उतरविला.

नंतर पंचनामा केला. सायंकाळी ५ वाजता मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला होता. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती राहुल याला मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांसह मित्र मंडळींची रूग्णालयात गर्दी झाली होती. तर राहुल याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.