अल्पवयीन नवविवाहितेची आत्महत्या : पतीसह १३ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । दूध फेडरेशन परिसरातील दांडेकर नगरात १४ रोजी लग्नाच्या दहाव्या दिवशीच दीपिका (नाव बदललेले) या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान, दीपिका (नाव बदललेले) ही १५ वर्षांची असल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे अल्पवयीन असतानाही तिचा विवाह केला व तिला सांसारिक जबाबदारी पार पाडण्यास भाग पाडले, अशा आशयाची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर नवरदेवासह सासरचे व इतर अशा एकूण १३ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवदेवासह चार जणांना अटक केली असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

दीपिका (नाव बदललेले) जन्मतारीख १२ सप्टेंबर २००५ अशी आहे. यावल तालुक्यातील न्हावी येथील शारदा विद्यालयात इयत्ता दहावीत ती शिकत होती. ११ जुलै रोजीच तिचे जळगावातील सागर राजू निकम या तरुणाशी लग्न लावण्यात आले होते. लग्नाच्या दहाव्याच दिवशी करीनाने गळफास घेऊन आत्महत्या केली.दीपिका (नाव बदललेले)चे लग्न ठरवताना तिची आई सुलोचना भालेराव यांना विश्वासात घेतले नव्हते. जबदरस्तीने लग्न लावल्याचा आरोप करीत सुलोचना यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दीपिका (नाव बदललेले)चे वय कमी असल्याने तिला संसाराची जबाबदारी सांभाळता येणार नाही तरीदेखील तिचे लग्न लावून दिले. तिला जबाबदारी सांभाळता आली नसल्याने तिने आत्महत्या केली. यात सुलोचना यांनी फिर्याद दिली. 

या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

त्यानुसार दीपिका (नाव बदललेले)ची आजी गंगाबाई वसंत भालेराव, लीलाधर सोमा तायडे, संजू लीलाधार तायडे, सुशीलाबाई लीलाधर तायडे (सर्व रा. न्हावी, ता. यावल), पती सागर राजू निकम, सासरे राजू सुकदेव निकम, सासू माया सुनील निकम, सुनील सुकदेव निकम, निर्मला राजू निकम, नागेश राजू निकम (सर्व रा. दांडेकरनगर), राखी संजू तायडे (रा. न्हावी ता. यावल), सुरेखा भीमराव सोनवणे (रा. गिरडगाव, ता.यावल) व छाया सुभाष इंगळे (रा. शिरसाड ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आरोपी सागर निकम, राजू निकम, नागेश निकम व सुनील निकम या चौघांना शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. रविवारी चौघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक जगदीश मोरे तपास करीत आहेत.