जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील कानळदा येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात हौदामधील पाण्यात झोपून अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या तरुणीने आयुष्य संपविले. प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रियंका हिचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ती मध्यंतरी पुणे येथे नोकरीलादेखील होती. दोन वर्षांपूर्वी ती गावी परतली व आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी घराच्या मागे गुरांच्या गोठ्यानजीक असलेल्या पाण्याच्या हौदात असलेल्या पाण्यात झोपून तिने आपले जीवन संपविले.
काही वेळाने तिचे काका गोठ्याकडे गेले, त्या वेळी त्यांना तरुणी पाण्यात बुडलेल्या अवस्थेत दिसली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पोलिस पाटील नारायण पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्या वेळी पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.