जळगाव जिल्हा

अर्णव चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका? विदर्भात अलर्ट; जळगाववर काय परिणाम होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून या वादळाचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेश आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांवर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा तसेच जोरदार वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात या वादळाचा थेट किती परिणाम होईल, याबाबत सध्या तरी अधिकृत हवामान अंदाज नाहीय

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वादळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, तर काही भागांत तो ताशी १४० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येऊ शकते.

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा

या वादळाचा परिणाम पूर्व विदर्भातील जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता असून, संबंधित जिल्ह्यांसाठी हवामान सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे वृत्त आहे. नागपूर परिसरात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात तुलनेने कमी परिणाम जाणवू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील हवामानाकडे लक्ष

दरम्यान, चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत कसा जाणवतो, याकडे आता लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्यातही हवामानात बदल होतो का, याबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषतः कापूस, मका आणि इतर खरीप पिकांची काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊस व वाऱ्याचा अंदाज महत्त्वाचा ठरू शकतो.

जळगाव जिल्ह्याला या चक्रीवादळाचा थेट तडाखा बसेल, असा कुठलाही सध्या अंदाज नाहीय. मात्र जिल्ह्यात २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button