
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव येथे निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत कर्तव्य बजावताना दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांवर जळगावातील रुग्णालयांत उपचार सुरू असून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत उपचारांबाबत माहिती घेत एसपींनी जखमी कर्मचाऱ्यांना धीर दिला.
एका पोलिसाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर
किनगाव येथील तणावाच्या परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील (बक्कल क्रमांक ३३९५), नेमणूक यावल पोलीस स्टेशन, हे जखमी झाले. त्यांच्या नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर जळगाव येथील आरुषी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दगड लागल्याने दुसरा पोलीस कर्मचारी जखमी
या घटनेत पोलीस शिपाई दानिश हारून तांबोळी (बक्कल क्रमांक ०२९९), नेमणूक पोलीस मुख्यालय, आरसीपी पथक, हेही जखमी झाले. त्यांच्या कमरेला दगड लागल्याने दुखापत झाली असून, त्यांच्यावर जळगाव येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही रुग्णालयांत जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. कायदा व सुव्यवस्था राखताना जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पोलीस प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या भेटीतून मिळाला.
कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याच्या या कृतीतून पोलीस दलातील सहकार्याची आणि बांधिलकीची भावना अधोरेखित झाली. दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना लवकर आराम मिळावा, अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.





