⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

अभ्यासात स्वतःला झोकूनद्याल तर यश निश्चित ; डॉ.जावळे

जळगाव – लाईव्ह न्युज । २८ एप्रिल २०२२ । नेहमी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतांना स्वत:ला अभ्यासात पूर्णपणे झोकून द्या तुमचे यश निश्चित आहे असे मत राज्य कर निरीक्षक डॉ. जयश्री जावळे यांनी व्यक्त केले. बेंडाळे महाविद्यालयाच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र व फिनिशिंग स्कुलतर्फे विविध स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या.

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व फिनिशिंग स्कुल यांच्या माध्यमातून आयोजित विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन राज्य कर निरीक्षक, जळगाव डॉ. जयश्री जावळे यांच्या हस्ते झाले. मुलींना स्पर्धा परीक्षा करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करीत भावनांचे योग्य व्यवस्थापन करीत यशाचा मार्ग कसा सुकर करावा याबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना योग्य व कमी पुस्तके निवडून त्याचा अधिक सराव करावा. या सोबतच जर आपण वेळोवेळी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नसाल तर प्लॅन बी तयार करावा, अन्यथा मानसिक संघर्ष वाढते, असे उद्घाटनपर भाषणात डॉ. जावळे यांनी सांगितले. उद्घाटन सत्रानंतर लगेच पुढच्या सत्रात प्रीती तारकस-जडिये यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात प्रीती तारकस-जडिये यांनी युपीएससी परिक्षेची पूर्ण माहिती, परीक्षेचा अभ्यासक्रम व आवश्यक पुस्तके इत्यादींबाबत सखोल माहिती दिली.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी तर आभार डॉ. विनोद नन्नावरे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे व यांच्या मार्गदर्शनात डॉ. सचिन कुंभार, प्रा. सुचित्रा लोंढे, प्रा. निलेश कोळी, प्रा. रविकुमार परदेशी, सागर तायडे, शांताराम पाटील व गणेश सुपे यांनी सहकार्य केले.