⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पोलीस दलात काम करताना संघर्ष समजून घेणे आवश्यक

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । पोलीस दलात काम करत असताना सतत संघर्षजन्य परिस्थितीस सामोरे जावे लागते. हा संघर्ष आधी समजून घेणे, सुसंवाद साधणे यातून संघर्ष सुटण्यास, परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास नक्कीच मदत होते. पोलिसांना ड्युटी बजावत असताना संघर्ष परिवर्तन कार्यशाळेचा जीवनात उपयोग होईल, असा सूर मान्यवर व अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पोलिस दलातील ३० अधिकाऱ्यांसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे जैन हिल्स गांधीतीर्थ येथे दोन दिवसांची ‘संघर्ष परिवर्तन’ निवासी कार्यशाळा ४ व ५ ऑक्टोबरला घेण्यात आली. पोलिस दलात काम करत असताना तोच तो एकसुरीपणा पोलिस अनुभवत असतात. त्यांच्या व्यक्तिगत व कार्यालयीन कामकाजात चांगला बदल घडावा या उद्देशाने पोलिस दलाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून पोलिसांसाठी तीन दिवसांची कार्यशाळा घेण्याचे ठरले.

संघर्ष व परिवर्तन या मुख्य विषयावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक सुदर्शन आयंगार, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ.आश्विन झाला, सुधीर पाटील यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने खेळ, प्रात्यक्षिक तसेच विचारांचे आदान-प्रदान आणि व्याख्यानाच्या स्वरूपात समजावून सांगितले. कार्यशाळेचा समारोप अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी पोलिस आणि महात्मा गांधीजींचे विचार हा विरोधाभास असला तरी शांती प्रस्थापित करण्यासाठी समाजात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन केले.