पोलिसांची जोरदार कारवाई :  दरोड्यापूर्वीच संशयित गावठी पिस्टलासह जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज : 6 एप्रिल २०२३ : पिस्टलाच्या धाकावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पाठलाग करून पोलिसांनी एका संशयीताला गावठी कट्ट्यासह अटक केली असून अन्य चार संशयित मात्र पसार झाले. आशुतोष सुरेश मोरे (21, एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला
एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावरील गुन्हेगार विशाल राजु अहिरे (रा. ामेश्वर कॉलनी जळगाव) व त्याचे साथीदार टोळीने दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. मंगळवार, 4 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता मेहरुण स्मशानभूमीजवळ असलेल्या बगीच्यानजीक छापा टाकल्यानंतर संशयित विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे (रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव), गोपाल चौधरी, दिक्षांत उर्फ दादु सपकाळे, शुभम धोबी (सर्व रा.जळगाव) हे टोळीतील सदस्य दरोड्याच्या तयारीत असतानाच पोलिस आल्यानंतर पळू लागले मात्र हवालदार जितेंद्र राजपूत व महेंद्र पाटील यांनी पाठलाग करून आशुतोष मोरे यास ताब्यात घेतले तर अन्य संशियत दुचाकीवरून पसार झाले. अंग झडतीत आरोपीकडे 25 हजारांचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले. दरम्यान, जितेंद्र राजपूत यांच्या फिर्यादीवरून पाच जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार जितेंद्र राजपुत, महेंन्द्रसिंग पाटील, पोलिस नाईक बडगुजर, विकास सातदिवे, योगेश बारी, ललित नारखेडे, चंद्रकांत पाटील आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, अटकेतील आरोपी आशुतोष मोरे यास न्या.जानव्ही केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहेत.