रेशन दुकानांतील काळाबाजार थांबवा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । सरकारकडून गरिब लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या रेशनच्या धान्याचा जिल्ह्यातील रेशन दुकानांत होत असलेला काळाबाजार थांबवावा, तसेच रेशन दुकानांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी रौद्र शंभो बहुउद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिधापत्रिकेवर पाच नावे असताना फक्त दोन जणांची नावे आहेत. दोनच जणांचे धान्य मिळेल, अशी दिशाभूल करण्यात येत आहे. संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, निमखेडी शिवार स्वस्तधान्य दुकान क्रमांक ६२४४ या दुकानदाराविरुध्द अनेक तक्रारी असताना दुकानदारावर कारवाई का होत नाही? ऑनलाइन तक्रारीची दखल घेतली जात नाही. रेशन गोदामातून धान्याची कशी विल्हेवाट लावली जाते, एका दुकानाला ३ ते ४ दुकाने कुणाच्या वरदहस्ताने जोडले आहेत. पुरवठा विभागाच्या दक्षता समितींवर सदस्य असलेल्यांच्या नातेवाईकांना रेशन दुकानाचा परवाना कसा देण्यात आला? याबाबतही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रौद्र शंभो संस्थेचे अध्यक्ष तुषार सूर्यवंशी, उपाध्यक्ष भगवान सोनवणे, सचिव योगेश कदम यांनी केली आहे.