जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील प्रवाशांसाठी आणि तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम रेल्वेने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ओखा–मदुराई विशेष गाडीला आता ओखा–तिरुपती नियमित एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गाडीला भुसावळसह जळगाव आणि अमळनेर स्थानकांवरही थांबा देण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

गाडी क्रमांक १९५६० ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्स्प्रेस १९ मे २०२६ पासून नियमित धावणार आहे. ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी ओखा स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमळनेरला दुपारी ४.२७ वाजता, जळगावला ६.१८ वाजता आणि भुसावळ स्टेशनला ६.४० वाजता पोहोचेल. यांनतर तिसऱ्या दिवशी तिरुपती येथे बुधवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल.

तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक १९५५९ तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस १४ मे २०२६ पासून नियमित धावणार असून, ती तिरुपती येथून प्रत्येक गुरुवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटून ओखा येथे शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी दाखल होईल.
या प्रमुख स्थानकांवर असेल थांबा?
ओखा–तिरुपती एक्स्प्रेसला मार्गावरील अनेक प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. ज्यामध्ये द्वारका, खंभलिया, जामनगर, हापा, राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, विरमगाम, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरुच, उधना, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, हुजुर साहिब नांदेड, बासर, निजामाबाद, कामरेड्डी, बोलारुम, काचेगुडा, मेहबूबनगर, गडवाल, कुर्नूल सिटी, ढोणे, तडीपात्री, कडपा, रझामपेटा आणि रेनिगुंट या स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने या गाडीत प्रवाशांसाठी एसी टू टियर, एसी थ्री टियर, स्लीपर क्लास तसेच जनरल डब्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ओखा–तिरुपती गाडीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर १० मेपासून सुरू करण्यात आले आहे.







