⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली : अमोल शिंदे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमा योजनेतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून, यात पाचोरा तालुक्यात ६८८ व भडगाव तालुक्यात ८३ अशा एकूण ७७१  शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, कठीण काळात शेतकऱ्यांना या सरकारने वार्‍यावर सोडले त्यांना दिवाळीआधी खात्यावर दुष्काळी मदत जाहीर करायचे घोषित करून दिवाळीनंतर तुटपुंज्या पद्धतीची मदत करत त्यांची दिवाळी काळी करून शेतकऱ्यांची थट्टा केली, असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले.

सविस्तर असे की, पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पाचोरा तालुक्यातील ६८८ शेतकऱ्यांसाठी ८० लाख ७४ हजार ९६५ रुपये व भडगाव तालुक्यातील ८३ शेतकऱ्यांना ४५३३३३ रुपये अशी एकूण ८५२८२९८ रुपये रक्कम जमा झाली आहे. त्यासंदर्भात दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी जळगाव व प्रांताधिकारी पाचोरा आणि तहसीलदार पाचोरा यांच्याकडे अमोल शिंदे यांनी पत्राद्वारे मागणी लावून धरली होती.

त्या अनुषंगाने सदर रक्कम जमा झालेले असून पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाचा खंड व नंतर झालेल्या अतिमुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधव पूर्णपणे हवालदिल झाले होते. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना या सरकारने वार्‍यावर सोडले त्यांना दिवाळीआधी खात्यावर दुष्काळी मदत जाहीर करायचे घोषित करून दिवाळीनंतर तुटपुंज्या पद्धतीची मदत करत त्यांची दिवाळी काळी करून शेतकऱ्यांची थट्टा केली. असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. तसेच सदर नुकसानीची भरपाई रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामान परिस्थिती (MID SEASON ADVERSITY) या दोन प्रकारे कापूस, उडीद, मूग, सोयाबीन यासाठी मंजूर करून देण्यात आलेली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले,

खा.उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे सदर नुकसानभरपाईची रक्कम मिळवून दिल्याबद्दल पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा.उन्मेष पाटील व अमोल शिंदे यांचे आभार व्यक्त केले.