⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून एसटी चालकाचा दुर्दैवी मृत्यू ; जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । कुलर मध्ये पाणी भरत असताना अचानक विजेचा धक्का लागून एसटी महामंडळातील चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील बिबानगर येथे घडली. भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८, मूळ रा. कठोरा ता. जळगाव,हल्ली मु. बिबा नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव असून याबाबत याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले भास्कर आत्माराम बोरसे कठोरा येथे राहत होते. मात्र जळगाव शहरात बिबा नगर येथे त्यांनी नुकतेच नवीन घर घेतले होते. तेथे राहायला गेले होते. शनिवारी दि. १ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते ड्युटी वरून काही कामानिमित्त घरी आले होते. त्यावेळेला घरी कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी ते गेले असताना त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते बाजूला फेकले गेले.

या वेळेला त्यांचा मुलगा त्यांना वाचण्यासाठी आला असतांना त्यालाही विजेचा धक्का लागत असताना थोडक्यात बचावला आहे. यानंतर मात्र कुटुंबीयांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने भास्कर बोरसे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी रुग्णालयात कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एसटी चालकाच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी व सहकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली होती.