ऐन दिवाळीत एसटी बसचा प्रवास महागणार; हंगामी १० टक्के दरवाढ

ऑक्टोबर 13, 2024 12:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२४ । राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीच्या काळात परिवर्तनशील भाडेवाढ काही कालावधीसाठी लागू केली जात असते. यंदा २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीसाठी १० टक्के भाडेवाढ सर्व बस सेवांवर लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीत सुखकर प्रवास करीत जाणाऱ्या प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

bus st

दहा टक्के तिकीट दरवाढीनसार पुणे ६५, मुंबई ९०, नाशिक, सुरत ३५, तर नागरपूरला ६५ रुपये जादा मोजावे लागणार आहे. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्या लागतात आणि सर्वांना आपल्या गावाला जाण्याची ओढ लागते. यंदा २५ व २६ ऑक्टोबरपासून शाळांना सुट्या लागणार आहे. त्यात दिवाळीत गावाला जाणाऱ्यांकडून दोन महिन्याआधीच रेल्वेगाड्यांचे तिकीट बुकिंग फुल्ल आहे, तर खासगी बसच्या तिकिटाची दरवाढ होत असल्याने खिशाला परवडत नसल्याने प्रवासी दिवाळीत एसटीने प्रवास करण्यावर भर देतात.

महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर ७५ वर्षांवरील वृद्धांना एसटीत मोफत प्रवासाची सवलत असल्याने एसटीत प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महसूलवाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून २७ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी केली जाणार आहे.

आरक्षण केले असल्यास फरकाची रक्कम द्यावी लागणार
दिवाळीसाठी एसटी महामंडळाने एमएसआरटीसीच्या वेबसाइटवर आधीच ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा सुरू केलेली आहे. त्यानुसार अनेक प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे. त्यात एसटीने २५ ऑक्टोबरपासून १० टक्के भाडेवाढ केली असल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशाला तिकिटाची फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now