जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । जळगाव शहरासाठी शासनाकडून मंजूर घनकचरा प्रकल्प व अमृत योजनेचा शहरी विकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. के एच. गोविंदा राज यांनी सोमवारी मुंबईत आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडून त्यांनी जळगाव शहरासाठी मंजुर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व अमृत योजने अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेची माहिती घेतली.
यावेळी, अमृत २.० चा डीपीआर तातडीने तयार करून शिल्लक निधी खर्च करा व घनकचरा प्रकल्पाचा विषय देखील तातडीने मार्गी लावा, अन्यथा पुढील निधी वितरीत केला जाणार नाही असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला.
जळगाव शहरातील घनकचरा प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे केंद्र व राज्यशासनाकडून मिळालेला निधी खर्च होऊ शकलेला नाही, तसेच अमृत योजनेच्या २.० चा डीपीआर बनविण्याचे काम देखील गेल्या सात आठ महिन्यापासून रखडले आहे.
त्यामुळे शासनाकडून मिळालेल्या निधी शिल्लक आहे म्हणून सदर योजना तातडीने मार्गी लावा अन्यथा पुढील निधी वितरीत केला जाणार नाही, असा इशारा शहरी विकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. के एच. गोविंदा राज यांनी जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना दिला.
दरम्यान मनपा आयुक्त डॉ. गायकवाड यांनी अमृत योजनेच्या लाईन टाकण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग करावी लागणार आहे व त्यासाठी रेल्वेला पेमेंट अदा करण्यात येणाऱ्या अडचणींची माहिती त्यांना दिली व सदर अडचण दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे सांगितले.
तसेच अमृत योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मलशुद्धकरण प्रकल्पाच्या विज जोडणीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी अशी चर्चा देखील त्यांच्याशी केली..