ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना वेग : आ. गुलाबराव पाटील
वाकटुकी येथे ग्रामपंचायत कार्यालय व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातुनच मार्गी लागत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा कणा असतो. या ठिकाणी येणार्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून अधिक विकासात्मक कामे करावी असे प्रतिपादन तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील यांनी केले.
ते वाकटुकी येथे डीपीडीसीच्या माध्यमातून २० लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेले ग्रामपंचायत कार्यालय आणि आमदार निधीतून १० लाख खर्चून उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर होते. आ. गुलाबराव पाटील यांनी आपल्या पालकमंत्रीपदाच्या काळात जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयांसाठी प्रत्येकी २० लाख रूपयांचा निधी मंजूर करून नवीन इमारतींची उभारणी करण्यास प्राधान्य दिले होते. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे देखील याच प्रकारे डीपीडीसीच्या २० लाख रूपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आलेले आहे. तर आमदार निधीतून १० लाखांचे सामाजिक सभागृह देखील येथे पूर्ण झाले आहे. या दोन्ही वास्तूंचे लोकार्पण आज तत्कालीन पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जि.प. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आ.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर होते.
प्रारंभी वाकटुकी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आ. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. पाटील यांनी वाकटुकी ते चमगाव या रस्त्याचे डांबरीकरण आणि शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येऊन अभ्यासिका बांधकाम मंजूर करणार असल्याचे सांगितले. या वेळी व्यासपीठावर माजी पं. स.सभापती प्रेमराज पाटील, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, मा. जि. प. सदस्य गोपाल चौधरी, रवि देशमुख, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, दामू अण्णा पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, पं. स. सदस्य मुकुंदराव नन्नवरे, लोकनियुक्त सरपंच भागाबाई पाटील , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील, उपसरपंच गोपाल कोळी, ग्रा. पं. सदस्य रेखाबाई पाटील, माहेश्वरी पाटील , संजूबाई कोळी, संदीप पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, मुख्यध्यापिका रामेश्वरी बडगुजर, उपशिक्षक संभाजी बिरासदार, पंढरीनाथ कोळी, शिवसेनेचे शाखाप्रमुख रामकृष्ण पाटील, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष पंजाबराव पाटील सोसायटीचे चेअरमन शत्रु पाटील व्हाईस चेअरमन नारायण कोळी, सर्व संचालक यांच्यासह गावातील व परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाची लोकसंख्या किती आहे ? हे न बघता मी कोणत्याही गावाची गरज पाहून विकासकामांना प्राधान्य देतो. यामुळे वाकटुकीसारख्या लहान गावात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून या माध्यमातून ग्रामस्थाना सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. भविष्यात देखील याच प्रकारे आपण विकासकामांसाठी कटीबध्द राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. तर, अध्यक्षीय भाषणात जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटी हे दोन महत्वाचे घटक असल्याचे सांगितले. परिसरातील जनतेने वेळेत कर्जफेड केल्यास त्यांना पुढे अडचण येत नाही. यामुळे सर्वांनी वेळेत कर्ज भरण्याचे आवाहन त्यांनी केले. तर वाकटुकीसारख्या लहान गावासाठी सुमारे एक कोटी रूपयांची कामे मंजूर केल्याबद्दल त्यांनी आ. गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले.
याच कार्यक्रमात जि. प. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आ.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले. तसेच येथून बदली झालेले ग्रामसेवक अनिल पाटील यांचा आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व प्रास्ताविक भूषण पाटील यांनी केले तर आभार ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले.