आपल्या भागातील बीएलओशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून, ही मोहीम दि. २० जून २०२६ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुरू आहे.

या मोहिमेअंतर्गत दि. ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन गणना पत्रकांचे (Enumeration Form – EF) वितरण करीत आहेत. मतदारांनी ही गणना पत्रके काळजीपूर्वक भरून संबंधित बीएलओकडे विहित मुदतीत जमा करावीत. विहित कालावधीत गणना पत्रके जमा करणाऱ्या मतदारांचीच नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

मतदारांच्या सोयीसाठी तसेच सर्व लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व बीएलओंची वार्डनिहाय अद्ययावत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या बीएलओचे नाव व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मतदारांनी आपल्या भागातील अधिकृत बीएलओशी त्वरित संपर्क साधून गणना पत्रक प्राप्त करावे, ते वेळेत भरून जमा करावे आणि आपले नाव मतदार यादीत सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी विनय गोसावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.










