⁠ 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
Home | गुन्हे | ‘ती’ने देह विक्री केली, बहिणीचे शिक्षण पूर्ण केले, स्वतःचा नवा संसार थाटला आणि आज तिला अभिमान आहे ‘वेश्या व्यवसायाचा’

‘ती’ने देह विक्री केली, बहिणीचे शिक्षण पूर्ण केले, स्वतःचा नवा संसार थाटला आणि आज तिला अभिमान आहे ‘वेश्या व्यवसायाचा’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । बचपन के वो दिन थे.., कब हम बडे हुये पता ही नहीं चला..! मूळ महाराष्ट्रातील पण हरियाणात सासरी जाऊन आज चोपड्या कुंटनखान्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या ‘चांदणी’ची कहाणी काही अशीच आहे. वडील पोलीस, आई गृहिणी, घरात तीन बहिणी.. सर्व सुखात सुरू होते. चांदणी नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर म्हणजेच जवानीच्या पहिल्या टप्प्यावर येऊन पोहचली. कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली, वडिलांची नोकरी गेली. मोठीचे लग्न केले आणि रातोरात चांदणीचे लग्न ठरले. हरियाणातील सासर ऐन सोळाव्या वर्षी पदरी आले. संसार समजतो तोच नशिबी कन्या रत्न लाभले. कन्या आली आणि सासरच्या मंडळींनी चांदणीला माहेरी धाडले. तिथून सुरू झाली चांदणीची सेकंड इनिंग म्हणजेच सुखी वेश्या व्यवसायाची नांदी..!

मध्यमवर्गीय परिवारात जन्म घेऊन आयुष्य घडवण्याचे स्वप्न पाहताना अचानक आयुष्यत भयंकर मोठं वादळ येत आणि सगळं संपल्यासारखं वाटत असताना ती खचलेली पुन्हा उभी राहते आणि जीवनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होते. अशाच एका चांदणीच्या संघर्षाची कहाणी आज आपल्या समोर आणलेले आहे. चांदणी (नाव बदललेले) नाव मुद्दामच चांदणी ठेवले. चोपड्याच्या कुंटणखान्यात देहविक्री व्यवसाय करणाऱ्या चांदणीच्या आयुष्यात अमावस्येसारखे अनेक काळेकुट्ट क्षण आले परंतु स्वतःच्या जिद्दीच्या सूर्यमय प्रकाशाने ती आजही चमकत आहे. आज दि.२ जून म्हणजेज जागतिक सेक्सवर्कर डे. ..अरे बापरे आता हे काय नवीन? खूप लोक विचारात पडले असणार कि हा पण काही दिवस आहे का साजरा करायला? कारण आपण वेश्या व्यवसायाला नेहमी चुकीच्या आणि वाईट नजरेने पाहत असतो. पण याच वेश्याव्यवसायातून कितीतरी महिलांच्या घरातील चूल पेटते तर काहींच्या परिवाराचा उदरनिर्वाह देखील होत असतो.

पोलीस वडिलांची नोकरी गेली, झोपेतून उठताच चांदणीचे लग्न झाले
चांदणीच्या कहाणीची सुरुवात होते महाराष्ट्रातील एका शहरातून. वडील पेशाने पोलीस, घरात ३ बहिणी आणि वडिलांना दोन बायका. सगळं सुरळीत चालू असताना अचानक वडिलांना निलंबित करण्यात आलं. घरची परिस्थिती अगदीच हलाखाची आणि त्यात तिन्ही मुली म्हणून मोठ्या बहिणीचं लग्न घाईघाईत उरकावुन घेतलं.चांदणी या घरातील मधली मुलगी व चांदणीपेक्षा अजून एक लहान बहीण असा परिवार आता घरात उरला होता. चांदणी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली होती. ‘सोळावे वरीस धोक्याचे’ म्हणतात पण चांदणीसाठी ते जास्तच धोक्याचे ठरले. कुठे महाविद्यालयात जाऊन प्रेम प्रकरणाच्या फंद्यात न पडता कुटुंबीयांनीच ते धोक्याचे केले. मोठीच लग्न उरकले आता आपण अजून १६ वर्षाचेच आहोत अजून दोन वर्ष लागतील असा विचार चांदणी करीत होती. ज्याप्रमाणे मोठ्या बहिणीचं लग्न घाईत उरकलं त्याचप्रमाणे चांदणीला कल्पना देखील नव्हती कि येणार दिवस हा तिचा लग्नाचा दिवस असणार. एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर चांदणीला अचानक समजले कि, आज आपलं लग्न आहे. गळ्यात माळा पडल्या आणि एका दिवसात लग्न होऊन महाराष्ट्राची चांदणी तिच्या सासरी म्हणजे हरियाणात पोहचली.


दोन वर्षात संसार मोडला, मुलीचा ताबा पतीने घेतला, शीला मावशीने दाखवला वेश्या व्यवसायाचे माया जगत
लग्नाच्या वयातील मुलींचे लग्नाला घेऊन खूप स्वप्न असतात. चांदणी देखील आपल्या स्वप्नांचे पूल बांधत होती. कधी त्या स्वप्नांचा भंग होईल हा विचार देखील त्या स्वप्नात नव्हता. लग्नाच्या दोन वर्षांनी चांदणीच्या संसारात एक कळी उमलली. अवघे १८ वय होते तिचे. कुटुंबाला वारस मिळाला म्हणत सासरच्या मंडळींना चांदणी नकोशी वाटू लागली. हळूहळू चांदणीचा छळ व्हायला लागला. मारझोड, शिवीगाळ, अत्याचार असहाय्य झाल्याने चांदणीने सासर सोडून माहेरी यायचा ठरवलं पण या भानगडीत चांदणीचे छोटे बाळ सासरीच राहिले. चांदणी माहेरी आली खरी पण इथंही परिस्थिती नाजूक असल्याने घराचा उदर्निर्वाह भागवण्यासाठी चांदणीने एका दवाखान्यात नोकरी करण्यास सुरवात केली. २००७ साली त्या दवाखान्यात ७०० रुपये महिन्याने चांदणीची पहिली कमाई सुरु झाली. परिवार मोठा आणि पगार कमी म्हणून अजून कमाईची गरज भासत होती. चांदणीची चिडचिड व्यथा पाहून सोबतच काम करणाऱ्या शीला मावशीने (नाव बदललेले) चांदणीला वेश्याव्यसायाबद्दल कल्पना दिली. चांदणीच्या गरजा अमाप, स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला घरी आणायची इच्छा होती आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई देण्यासाठी हजारोंचा खर्च चांदणीला दिसत होता.

३००, ५०० करीत १९ व्या वर्षी चांदणीने ‘रेड लाईट’ भागात प्रवेश केला आणि सर्वस्व केले अर्पण
मनाची मोठी घालमेल सुरु होती. चांदणी विचार करीत होती. मुलीला मिळवण्यासाठी आणि घराच्या परिस्थितीकडे बघून चांदणीने या व्यवसायात उतरायचं ठरवलं. ‘चल हा तुला ५०० देईल, तो तुला ३०० देईल’ हे शीला मावशीचे शब्द चांदणीच्या कानात सतत फिरत होते. पाच मिनिटासाठीच्या व्यवसायातून आपल्या चिंता दूर होतील या आशेने १९ व्य वर्षी चांदणी त्या व्यवसायात उतरली. हळूहळू पैसा दिसू लागला आणि व्यवसायाची सवय, पैशांची सवय चांदणीला त्यात ओढत घेऊन गेली. व्यवसायात चांदणीला एक मैत्रीण भेटली आणि दोघींची गट्टी जमली. दोन्ही व्यवसाय करीत असताना चांदणीच्या आयुष्यात आली एक ‘आक्का’. लहानश्या डबक्यातून दोन्ही समुद्रात म्हणजेच जाफराबादच्या कुंटणखान्यात पोहचल्या. चार आणे, आठ आण्याचा धंदा आता रुपयाचा झाला होता. सकाळी नोकरीचे नाव करून घरातून पाऊल टाकायचं आणि जाफराबादला जाऊन व्यवसाय करायचा हा चांदणीचा नित्यक्रम. सगळं सुरळीत असताना अचानक जाफराबाद येथे पोलिसांची धाड पडली आणि सगळे पकडले गेले. कारवाई आणि दंड भरल्यानंतर चांदणीची सुटका झाली. व्यवसायात माहीर झालेल्या चांदणीला हे काहीच वाटले नाही. चांदणीने आता पूर्णपणे स्वतःला या व्यवसायात झोकून दिले होते.

हे देखी वाचा : World Sex Workers Day : ‘रेड लाईट एरीया’वर आले आहेत अनेक सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या लिस्ट

जाफराबाद ते चोपडा व्हाया सुरत.. मुलीचा ताबा मिळाला, प्रियकराशी संसार थाटला
शिला मावशीच्या मार्गदर्शनाने आता चांदणी व्यवसायासाठी सुरत पोहचली होती. तिथं ६-७ महिने व्यवसाय केल्यानंतर मुलीला आणण्यासाठी हवे तसे पैसे जमा झाले. न्यायालयीन लढा देत चांदणीने मुलीला आपल्याला जवळ आणायचा निर्धार पक्का केला. चांदणी सुरत सोडून चोपडा आली. वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या आयुष्यात रोज शरीर सुख असत परंतु प्रेम नसते असे म्हणतात. एका वेश्येकडे पाहण्याचा किंवा तिच्या प्रती असलेला दृष्टिकोन हा निव्वळ शरीरसुख आणि स्वार्थासाठीच असतो. चांदणीबद्दल काहीसे वेगळे झाले. चोपड्यात वेश्याव्यवसाय करता करता चांदणीच्या आयुष्यात प्रेमाचा अंकुर बहराला. वेश्या असूनही एकाचे तिच्यावर प्रेम जडले. प्रेम मनापासून असल्याने त्याने केवळ स्वीकारलेच नाही तर लग्न करून तिच्या आयुष्याला सुखद वळण दिले. चांदणीच्या आयुष्याला नवीन उभारी मिळाली. जगण्याची नवी आस निर्माण झाली. मुलीसाठी लढा द्यायला आता चांदणी एकटी नव्हती तर तिचा नवरा देखील तिच्यासोबत होता. दोघांनी मिळून हरियाणाला जाऊन चांदणीच्या मुलीची सुटका देखील करून घरी आणले.

धंद्यात पडल्यावर माझं आयुष्य सुधारलं
वेश्या व्यवसायात आल्यावर आयुष्य नरक होते असे म्हणतात. जबरदस्तीने आलेल्या कितीतरी मुली, स्त्रियांच्या बाबतीत हे झाले देखील असेल पण चांदणी त्याला अपवाद होती. चांदणीचे शब्द होते कि, माझ्या धंद्याने माझं आयुष्य सुधारलं. चांदणीवर आज माहेरची आणि स्वतःच्या परिवाराची जबाबदारी होती. चांदणीच्या वेश्या व्यवसायाबद्दल आता चांदणीच्या घरी देखील माहिती होते. दुसऱ्या संसारातून चांदणीला आणखी दोन कन्या रत्न प्राप्त झाली आणि मुलींना देखील तिने या बाबतीत अंधारात ठेवलं नाही. चांदणीच्या या धंद्यातून लहान बहिणीचे पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यावर आहे. आता चांदणीच वय साधारणतः ३० च्या घरात असेल आणि महत्वाचं म्हणजे चांदणी वेश्याव्यवसाय करते आणि भविष्यात देखील करत राहील हे माहित असताना तिला स्वीकारणाऱ्या तिच्या नवऱ्याचा देखील तिला ठामपणे पाठिंबा आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक स्त्रियांमधली चांदणी एक होती. कधी विचार केला नसेल आयुष्यात इतके चढउतार असतील. ‘कभी ख़ुशी, कभी गम’ करीत चांदणी आज आनंदात हा व्यवसाय करतेय. आमच्या संवादातील चांदणीचे शेवटचं आणि महत्वपूर्ण वाक्य , ‘या धंद्यात पडल्यावर माझं आयुष्य सुधारलं आणि मला वेश्या व्यवसाय करीत असल्याचा अभिमान आहे.’

author avatar
टीम जळगाव लाईव्ह