जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात भाजपाचे संकटमोचक म्हणून राहिलेले माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक पक्षातर्फे बाजूला सारण्यात येत आहे का? अशी कुजबुज भाजपाच्या वर्तुळात सुरु झालीय. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील कुठलेही आंदोलन असो, गिरीश महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. अगदी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हाजारेंनासुद्धा आंदोलन करण्यासापून परावृत्त केले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा राज्यातील भाजपाचे संकटमोचक म्हणून पुढे आली होती.
मात्र गेल्या काही महिन्यातील पक्षांतर्गत हालचालीवरुन असे दिसून येतेय की आ. महाजन यांना पक्षातर्फे प्रमुख भूमिकांपासून बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शह म्हणून गिरीश महाजन यांना फडणवीसांनी जाणीवपूर्वक बळ दिले गेले. आता खडसे पक्षाबाहेर गेलेत त्यामुळे महाजनांची उपयुक्तता तशीही फडणवीसांच्या दृष्टीने कमी झाली आहे.
सध्या बी.एच.आर. प्रकरणी गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई होते आहे. त्यातच महाजनांच्या वर्चस्वाखालील जळगाव मनपात भाजप फुटली. सत्ता गेली, धुळ्यातही तशीच परिस्थिती निर्माण झाली. ते पाहून राज्य नेतृत्वाने जयप्रकाश रावळ यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची सूत्रे दिलीत. यापुढे रावळ यांचाच शब्द अंतीम असेल असे पक्षाचे सूत्रे सांगत आहेत.
आताही ओबीसी आरक्षण संदर्भात राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत असतांना जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व खा. रक्षा खडसे यांनी करावे अशा सूचना आहेत. गेल्या चार वर्षात प्रत्येक आंदोलन असो वा कार्यक्रम पक्षाचे नेतृत्व जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी केले आहे. सर्व निर्णयही त्यांनीच घेतले आहेत. अशा वेळी ओबीसी आंदोनाचे नेतृत्व पक्षाकडून खा. रक्षा खडसे यांच्याकडे देणे हे सर्वांना आश्चर्य वाटण्यासारखे आहे. या सर्व घडामोडीतून आ. गिरीश महाजन यांना निर्णय प्रक्रीयेपासून दूर केले जात आहे का? अशी कुजबूज पक्षात सुरु झाली आहे.