⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

बालगंधर्व खुले नाट्यगृह आणि रंगमंचनाट्य….

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । योगेश शुक्ल । सध्या बालगंधर्व आणि तेथील रंगमंच यावरुन बराच वाद रंगला आहे. जेव्हा बालगंधर्व खुले नाट्यगृह हा जळगावातील नाट्यकर्मींसाठी एकमेव पर्याय होता तेव्हा हाऊसफुल्ल झालेले बालगंधर्व मी या डोळ्यांनी पाहिले आहे. कालांतराने या थिएटरचा वापर अतिक्रमणाचे सामान ठेवण्यासाठी होऊ लागला. तोपर्यंत जळगावातील रंगकर्मींनाही दुसरे पर्याय उपलब्ध झाल्याने, त्यांचेही या थिएटरकडे दुर्लक्ष झाले. केवळ रंगभूमी दिन आणि राज्य नाट्य स्पर्धादरम्यान बालगंधर्वला रंगकर्मींचे पाय लागू लागले. त्यानंतर एक वर्षी पावसामुळे राज्य नाट्य स्पर्धा भैय्यासाहेब गंधे सभागृह, जे.डी.सी.सी. बॅकेचे सभागृह अशी प्रवास करती झाली. जे.डी.सी.सी.चे सभागृह बंद पडल्यावर पुन्हा गंधे सभागृहात राज्य नाट्य रंगू लागली. त्यानंतर ५९ व्या राज्यनाट्य स्पर्धेला शहरात नव्यानेच झालेले संभाजीराजे नाट्यगृह मिळाले. या दरम्यान काही रंगकर्मी रंगभूमीदिनासाठीच बालगंधर्वला जात राहिले. शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगणारे बालगंधर्व पुन्हा दुर्लक्षित झाले.

जळगाव शहराच्या महापालिकेने यंदा बालगंधर्व थिएटरचा रंगमंच खणून काढत तिथे कॉक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा दुर्लक्षित असलेले बालगंधर्व थिएटर चर्चेत आले. गेल्या दोन तीन दिवसात बालगंधर्वचे रंगमंचनाट्य चांगलेच रंगले असून, त्याने भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला आहे. या नाट्यादरम्यान राजकीय नेतृत्वांचाही समावेश झाल्याने, या वादाला वलय प्राप्त झाले. दरम्यान बालगंधर्वला दोन वेळा भेटी दिल्या गेल्या. पर्यायांचा विचार झाला. यादरम्यान राजकीय नेते आणि नाट्यकर्मी असा वाद रंगत असतांना, दोन रंगकर्मींमध्येच झालेल्या खडाजंगीत एका रंगकर्मीकडून अश्लाघ्य भाषेचा वापर झाला.

रंगमंच कसा असावा? यावरील अनेक मुद्दे पुन्हा समोर आले. त्यावर अनेक धुरीणांनी आपले विचार मांडले. अनेक अजून आपले विचार मांडत आहेत. मात्र असे असले तरी, आपापसातील वादात पुन्हा बालगंधर्व दुर्लक्षित राहू नये म्हणून सर्व नाट्यकर्मींनी एकत्र येणे गरजेचे आहे. सोबत चर्चा करून, त्यातून एकनिर्णय घेऊन, एकवाक्यतेने या प्रश्नाची मांडणी असावी, जेणेकरुन यासंदर्भातील कोणतीही माहिती नसलेल्या पण दुर्दैवाने या निर्णयाची व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या राजकीय लोकांनाही तात्काळ निर्णय घेणे शक्य होईल.

यानिमित्ताने अनेक मागण्या मांडण्यात येत आहेत, मात्र त्यातील व्यवहार्य(?) असलेल्या मागण्याच राजकीय लोकांकडून मान्य करण्यात येतील. यातील एक मागणी म्हणजे यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धा बालगंधर्वला घ्याव्यात. मात्र मुळात हे ठरविण्याचा अधिकार स्पर्धेत भाग घेणाऱ्या रंगमकर्मींनाही नाही आणि जळगाव शहर महानगरपालिकेलाही नाही. ते ठरविण्याच्या निर्णय घेण्याऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने संभाजी राजे नाट्यगृहाच्या बुकिंगसंदर्भातील पत्र पाठविल्याचेही ऐकिवात येत आहे.

बालगंधर्व खुले नाट्यगृहाची ऐतिहासिक परंपरा लक्षात घेता, ते बंदिस्त करण्याचेही प्रयत्न फार वर्षांपूर्वी झाले होते. आज खुले नाट्यगृहाची सद्यस्थितीत प्रेक्षकसंख्या सामावण्याची क्षमता ४५०० – ५००० प्रेक्षक अशी आहे. थिएटर बंदिस्त झाल्यास ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदिस्त नाट्यगृह होण्याची क्षमता ठेवते. मात्र त्यात एक तांत्रिक अडचण असल्याने, ते ही करणे महापालिकेला शक्य नाही.

आज जळगावात नाट्यकर्मींना उपलब्ध पर्यायात गंर्धे सभागृह, राजे संभाजी नाट्यगृह हे दोनच पर्याय आहेत. मात्र तेथील भाडे हौशी रंगकर्मींच्या खिशाला परवडणारे नाही. योग्य दुरुस्ती झाल्यास बालगंर्धव नाट्यगृह अत्यल्प भाड्यातील उत्तम पर्याय होऊ शकतो. पण त्यासाठी गरज आहे रंगकर्मींच्या एकत्रित येण्याची, एकवाक्यतेची. आरोप – प्रत्यारोपांच्या गदारोळात मूळ मुद्दा बाजूला राहून, राजकीय लोकांनीही नंतर दुर्लक्ष केल्यास, आहे त्या स्थितीत बालगंधर्व राहिल्यास ते तालिमीसाठीही वापरले जाणार नाही.

एकवाक्यता, एकसंघतेतून टीमवर्कमधून बालगंधर्व खुले नाट्यगृहाला पुन्हा सुगीचे दिवस यावे, ह्या सदिच्छेसह!

-योगेश शुक्ल, जेष्ठ रंगकर्मी : +91-9657701792