जळगाव लाईव्ह न्यूज । रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीसाठी सुरू करण्यात आलेले शासकीय खरेदी केंद्र ३० जूनला मुदत संपल्यामुळे १ जुलैपासून बंद करण्यात आले आहे. सुरुवातीला बारदाणासारख्या अडचणी आणि आता मुदत संपल्याचे कारण पुढे करत खरेदी बंद करण्यात आली.

गेल्या महिना-दीड महिन्यापासून हमी भावाने शासकीय ज्वारी खरेदी केंद्र ही सुरू होती. १ जुलैपासून खरेदी बंद झाली आहे. पारोळा तालुक्यात १६५७ शेतकऱ्यांनी ज्वारीची नोंदणी केली आहे. बारदाना अभावी सुरुवातीलाच हे ज्वारी खरेदी केंद्र उशिराने सुरू झाले. २० दिवस बारदाना नसल्याने खरेदी बंद होती. खरेदी केंद्रावर तालुक्यात १०७शेतकऱ्यांची चार हजार ३९० क्विंटल ज्वारी आतापर्यंत मोजली आहे.

१५५० शेतकरी हे आजही मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. खुल्या बाजारात ज्वारीला २४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. हमीभाव पाहता शेतकऱ्यांना क्विंटल मागे जवळपास हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.








