जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा जामनेर बोदवड या ब्रॉडगेज मार्गाच्या कामाला आता गती येण्यासाठी भूसंपादनावर भर आहे. बुधवारी विशेष भूसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थळ निरीक्षण करण्यात आले.

रेल्वे, महसूल भूमी अभिलेख विभाग, कृषी विभाग, व वन विभागातर्फे स्थळ निरीक्षण करून नोंदी घेतल्या. येत्या आठ महिन्यांत भूसंपादन करण्याचे उद्दिष्ट यावेळी अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. पाचोरा जामनेर बोदवड या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे अंतर ८४ किमी आहे. त्यावर ‘प्रधानमंत्री गती शक्ती’ योजनेतून एकूण ९५५ कोटी रुपये खर्च होतील.
रेल्वेसाठी शेतजमीन अधिग्रहण केली जाणार असल्याने काही शेतकऱ्यांनी वाढीव आर्थिक लाभाच्या लोभापोटी नियोजित रेल्वे मार्गात वृक्ष लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी गोदाम किंवा घरे बांधली आहेत. मात्र पहिली अधिसूचना जारी झाल्यापासून तीन वर्षापूर्वीच्या सॅटेलाइट इमेज व ड्रोन कॅमेऱ्या द्वारे तपासणी करून लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून वृक्ष लागवड किंवा बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.