जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा आणि जागोजागी सुरु असलेल्या सट्टापेढ्या आता काही नवीन राहिलेले नाही. जळगाव शहरातील सट्टापेढ्यांची काही महिन्यांपूर्वी पोलखोल केल्यानंतर सर्वत्र शांतता होती. स्वतः पोलीस अधिक्षकांनी (SP Jalgaon) आंखोदेखी केल्यामुळे कारवाई करणे पोलिसांना भाग होते. जळगाव शहरात सट्टा, जुगार बंद झाला तरी ग्रामीण भागात मात्र सर्व कुशल मंगल होते. जळगावात तर सटोड्यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा ठेकाच घेतला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जुगाराचा अड्डा पुन्हा एकदा सुरु झाला आहे. दुसरीकडे माजी पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा बालेकिल्ला असलेल्या धरणगाव शहरात तर पोलीसदादांच्या आशिर्वादाने अवैध धंदे चालकांची चांगलीच चंगळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे आणि व्यापारी संकुलात जागोजागी टपऱ्यांवर बिनधास्तपणे सट्टा घेतला जातो.
जळगाव जिल्ह्यातील सट्टा, जुगाराचा दररोजची उलाढाल लाखो किंबहुना करोडोत असू शकते. लहानात लहान सट्टापेढीवर देखील दररोज हजारोंची उलाढाल होत असते. सट्टापेढीवर अनेकांचे घर चालते हे खरे असले तरी सट्टा, जुगाराच्या नादी लागून कुटुंब उध्वस्त झालेले देखील अनेक आहेत. कोणताही अवैध धंदा पोलीस आणि प्रशासनाच्या सहकार्याशिवाय चालणे शक्यच नाही. दोन दिवसापूर्वीच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेंदालाल मील परिसरात गल्लोगल्ली अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप करीत महिलांनी सहाय्यक अधिक्षकांना घेराव घातला होता. शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारू विक्री केली जाते. अनेक ठिकाणी तर गावठी हातभट्टीची दारू तयार देखील केली जाते.
दारूशिवाय सट्टा, जुगार कसा बिनधास्त सुरु आहे याची पोलखोलच काही महिन्यांपूर्वी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’च्या (Jalgaon Live News) माध्यमातून करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (IPS Pravin Mundhe) यांना सट्टा, जुगार अड्ड्यांची आंखोदेखील परिस्थिती दाखविल्यावर ते देखील आश्चर्यचकीत झाले होते. शहरातील मेहरूण तलाव परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जुगार अड्डा सुरु असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Jalgaon) देण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या निवेदनानंतर जळगाव लाईव्हने देखील वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत पोलिसांनी कारवाई देखील केली. काही महिने जुगार अड्डा बंद न होता केवळ इतरत्र हलविण्यात आला होता. पावसाळ्याचे दिवस सुरु होताच जुगार अड्डा पुन्हा जैसे थे झाला आहे. जळगाव लाईव्हच्या वृत्तानुसार शहरातील सट्टा, जुगार अड्डे बंद झाले तरी जळगाव ग्रामीणला मात्र सुगीचे दिवस आले होते. जळगाव ग्रामीणला आजवर काहीच फरक पडलेला नाही.
हे देखील वाचा : शौक बडी चीज हैं.. अवैध सावकारी बोकाळली, सावकार तुपाशी तर गरजू उपाशी
राज्यात सत्तांतर होवो कि देशात राष्ट्रपती निवड होवो, स्थानिक पोलीस आणि इतर कलेक्शन करणाऱ्या पोलिसांच्या आशिर्वादाने सट्टा, जुगार अड्डे बिनधास्त सुरु होते. धरणगाव आजवर शिवसेना, (Shivsena) माजी पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh) यांचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या मागे आणि छत्रपतींच्या नावे असलेल्या व्यापारी संकुलात सट्टापेढ्यांचा (Gambling) बाजार मांडण्यात आला आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या परिसरात जागोजागी पानटपरीवर बिनधास्तपणे सट्टा घेतला जात आहे. अवघ्या ३०० मीटर अंतरात किमान ८ ठिकाणी सट्टा घेतला जातो. तीन ठिकाणी तर केवळ सट्ट्याचे आकडे घेण्यासाठी स्वतंत्र टपरी थाटण्यात आली आहे.
मुख्य चौकात कायम विशेषतः बाजाराच्या दिवशी पोलीस कर्मचारी तैनात असताना देखील त्यांच्यासमोर सट्टापेढ्या (Satta Matka) बिनधास्तपणे सुरु असतात. पोलीस आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतक्या बिनधास्तपणे सट्टापेढी सुरु असणे शक्यच नाही. छत्रपतींचा अवमान होत असताना देखील शिवसैनिक आणि सर्व छत्रपती प्रेमी चूप राहत असल्याने काहीतरी मोठा मासा यामागे आहे हे प्रथमदर्शनी दिसून येते. धरणगावमार्गे चोपडा, अमळनेर किंवा इतर ठिकाणी ये-जा करणारे लोकप्रतिनिधी, मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे या खुलेआम सुरु असलेल्या सट्टापेढ्यांकडे लक्ष कसे गेले नाही याचे आश्चर्य आहे.
हे देखील वाचा : Jalgaon SP : ..जेव्हा पोलीस अधीक्षक संतापतात, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर
पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय सट्टा घेणारे पोलीस ठाण्याजवळ सट्टापेढी सुरु करण्याची हिम्मत करणे शक्यच नाही. धरणगाव पोलीस धडक कारवाई करतील यात शंका असली तरी एलसीबी, उपविभागीय अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी कारवाईचा परिणाम किती दिवस, महिने असे हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.
धरणगाव शहरातील सट्टापेढ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नियमीत कारवाई सुरूच असते. छत्रपती शिवाजी महाराज संकुलात कुठे सट्टा घेतला जात असल्याची माहित असल्यास त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
– राहुल खताळ, सहाय्यक निरीक्षक, धरणगाव