⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Jalgaon SP : ..जेव्हा पोलीस अधीक्षक संतापतात, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी विशेषतः खून वाढल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात मोकळ्या जागेवर दारू प्यायला सोबत बसले आणि त्यानंतर खून करण्यात आल्याचे काही प्रकार लागोपाठ समोर आले. जळगावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी तातडीची बैठक बोलावली. जळगाव शहरातील सर्व प्रभारी अधिकारी, डीबी आणि गोपनीय कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षकांनी चांगलेच फैलावर घेतले. आपल्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी प्रत्येकवेळी मीच सांगायला हवे का? अशा शब्दात मुंढे यांनी सर्वांना खडसावले.

जळगाव शहरात गेल्या दोन महिन्यात गुन्हेगारी मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत सुरु राहणाऱ्या अंडापाव, कोल्ड्रिंक्सच्या हातगाड्या, अवैधरित्या ठिकठिकाणी विशेषतः संवेदनशील भागात होणारी दारू विक्री, हातभट्टीचे वाढलेले प्रमाण, वाळू व्यवसायमुळे वाढलेली स्पर्धा, अवैध सावकारी व्यवसाय यामुळे गुंडगिरी वाढली आहे. गल्लोगल्ली दादा, भाई तयार झाले आहे. गल्लीबोळात झालेला किरकोळ वाद पोलीस ठाण्यात पोहचल्यावर आपसात समझोता केला जात असल्याने नंतर तोच वाद बदला म्हणून उफाळून बाहेर येतो. मोकळे मैदान, पाण्याच्या टाक्या, अंडापाव, चिकनच्या हातगाड्यांवर रात्रीच्या वेळी येथेच्छ मद्यपान केल्यानंतर वाद होऊन खून झाल्याचे प्रकार घडले आहे. गेल्या महिन्याभरात मेहरूण तलाव, भोईटेनगर मालधक्का, कासमवाडी मैदानावर झालेला खून दारू पिऊनच झालेला होता.

जिल्ह्यातील आणि विशेषतः शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि शहरातील डीबी, गोपनीय शाखेतील कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. देशात आणि राज्यात सध्या सुरु असलेले वातावरण लक्षात घेता सकाळी गुडमॉर्निंग पथकाने आपले काम चोख पार पाडावे, रात्री १० वाजता सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आस्थापना बंद व्हायलाच हव्या, पोलीस ठाण्यात दाखल ३२३, ३२४, ३२६, ३०७ दंगलीतील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, चेन स्नॅचिंग पथक, रात्री गस्ती पथकाने चोख काम करावे, पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक हाणामारीच्या घटनांचा गुन्हा दाखल करूनच घ्यावा, अशा सूचना पोलीस अधिक्षकांनी दिल्या. तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करीत अवैध, चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तीन ठिकाणी २४ तास बंदोबस्त असलेले पॉईंट नेमण्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधिक्षकांच्या बैठकीनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असले काही ठराविक भागात अद्यापही रात्री हातगाड्या सुरु राहतात. मुख्य रस्त्यांवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या गल्लीबोळात रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. तसेच अवैधरित्या होणारी दारू विक्री अजूनही सुरूच असून संवेदनशील भागातच अवैध दारू विक्री केली जाते. रात्री दहा वाजता आस्थापना बंद असल्याने मुख्य रस्त्यावरील बहुतांश गर्दी कमी झाली आहे. अवैध वाळू वाहतूक अद्यापही सुरुच आहे. बैठकीनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी धडक कारवाई करीत एकाच दिवसात दहा वाळू डंपर पकडले होते. वाळूमाफियांमध्ये यामुळे दहशत निर्माण झाली असली तरी भिती नसल्याने व्यवसाय सुरूच आहे.

स्थानिक पोलीस ठाण्याच्या कलेक्शन करणाऱ्या पोलिसांचे अभय असल्यानेच अवैध वाळू वाहतूक आणि अवैध धंदे सुरु असतात. कोण अवैध धंदे करतो, कुठे अवैध दारू विक्री होते याबाबत पोलिसांना देखील माहिती असल्याने कारवाई केली जात नाही. काही वेळी कारवाई केली तरी केवळ नावालाच असते. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शोधण्यापेक्षा गुन्हा घडण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे. स्थानिक पोलीस ठाणे, डीबी, गोपनीय शाखा, एलसीबीने समन्वय ठेवून कार्य केले तरच हे शक्य होणार आहे. पोलीस अधिक्षकांनी घेतलेल्या बैठकीचा परिणाम कधीपर्यंत होणार हे सांगणे अवघड असले तरी जळगावरांना काही दिवसात त्याचे परिणाम मात्र दिसून येणार आहेत.