⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आमदारांची चुप्पी : राज्यात अधिवेशन सुरु असताना जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचे निघाले धिंडवडे!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । आजकाल कायद्याचा आणि पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचे पाहावयास मिळत आहे. कधीकाळी राज्याचे अधिवेशन सुरु झाले कि संपूर्ण राज्यात अवैध धंदे चालकांमध्ये हाय अलर्ट जारी होत होता. अवैध प्रवासी वाहतूक सोडली तर जवळपास सर्व अवैध धंदे बंद राहत होते. पोलिसच तशा सूचना करीत असल्याने धंदे चालक देखील घाबरून होते. सध्या सर्व आलबेल असल्याचे चित्र असून जिल्ह्यातील आमदार मूग गिळून आहे. आपले लोकप्रतिनिधीच अधिवेशनात आवाज उठवत नसल्याने अवैध धंदे चालक त्यांचे पिट्टू असल्याचे नागरिक बोलू लागले आहे. एकेकाळी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर जिल्हा हादरविणारे आमदार कधी बोलणार हे पाहणे सध्या औसुक्याचे आहे. Silence of MLAs: During the session in the state, the law and order issue in the district!

जळगाव जिल्ह्यातील खुनांची मालिका अद्यापही सुरूच असून बहुतांश ठिकाणी चाकू, सुरे, गावठी कट्ट्याचा बिनधास्त वापर केला गेला. गेल्या पंधरवड्यात जळगावात ४ खून झाले आहेत. चारही खून तरुणांचे असून किरकोळ कारणातून झाले आहेत. जळगावात तर रविवारी भर दिवसा देशी दारू अड्ड्यासमोर तरुणाचा शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर खुनाची घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोघांना लुटण्यात आले. उद्योजकाचे तीन लाख तर दुसऱ्याचे काही हजार लुटण्यात आले. पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या खऱ्या पण पोलिसांची गस्त कमी पडली हे देखील तितकेच खरे आहे.

जिल्ह्यात दररोज किमान ३ दुचाकी चोरी होत आहेत. पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या परिसरातून दुचाकी चोरी हे नित्याचेच झाले असून आता फक्त पोलीस ठाण्यातून आणि मुख्यालयातून दुचाकी चोरी होणे बाकी राहिले आहे. पोलीस दुचाकी चोरी रोखण्यात आणि दुचाकी चोरट्यांना पकडण्यात सपशेल अपयशी झाले असून प्रयत्न सुरु असल्याचे कारण ते नेहमी देतात. स्थानिक पोलीस दुचाकी चोर शोधू शकत नाही हे तर दिसतेच आहे पण एलसीबी देखील झोपा काढत आहे. जिल्ह्यात दररोज किमान दोन डझन दुचाकी चोर फिरत असतील हे पोलिसांना देखील माहिती आहे मात्र अवैध धंदे चालकांशी सलगी करण्यातच पोलिसांचा वेळ जातो.
हे देखील वाचा : मुक्ताईनगरात लाचार पोलीसांमुळे घडताहेत चुकीच्या घटना; एकनाथ खडसे

जळगाव लाईव्हने काही महिन्यांपूर्वी वृत्त प्रकाशित केल्यावर अवैध धंदे तीन महिन्यांसाठी बंद झाले होते मात्र गेल्या दोन महिन्यांपासून अवैध धंदे पुन्हा सुरु झाले आहेत. आर्थिक चक्र खंडित होत असल्याने अवैध धंदे गरजेचे असल्याचे पोलीस दबक्या आवाजात सांगतात. एका अवैध धंद्यांमुळे अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो हे खरे असले तरी तेच अवैध धंदे अनेकांचे कुटुंब उध्वस्त करते हे देखील खरे आहे. जळगावात तर अवैध दारू विक्रीमुळे दोन महिन्यात चार खून झाले असावे. राज्याचे अधिवेशन सुरु असल्याने जिल्ह्याच्या इभ्रतीचे धिंडवडे निघू शकतात याची पर्वा देखील पोलिसांना राहिलेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील राजकारणी अधिवेशनात चुप्पी साधून आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदार सध्या राज्यातील सरकारचाच भाग असल्याने ते आपल्याच जिल्ह्याचे पितळ उघड पाडू शकत नाही. सत्तेत नसताना आक्रमक असलेले आमदार अचानक चुप्प झाल्याने अवैध धंदे चालक त्यांचेच पंटर असावे असा आरोप नागरिक करीत आहे. जिल्ह्यात लूटमार, खून, चोऱ्या वाढल्या असताना आमदार चुप्प कसे हा मोठा प्रश्न आहेत. महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ ना.गुलाबराव पाटील, (Gulabrao Patil) संकटमोचक नेते ना.गिरीश महाजन, (Girish Mahajan) डॅशिंग आमदार मंगेश चव्हाण, (Mangesh Chavhan) तडफदार नेते आ.चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे देखील ब्र शब्द काढत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्याच्या अवैध धंद्याचा प्रश्न अधिवेशनात उचलत आक्रमक बाजू मांडल्याने पोलीस अधीक्षकांची बदली झाल्याचा जिल्ह्याचा इतिहास आहे.
हे देखील वाचा : Jalgaon SP : ..जेव्हा पोलीस अधीक्षक संतापतात, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर

आ.एकनाथराव खडसे (Eknathrao Khadase) यांनी आजवर बऱ्याचदा अधिवेशन गाजवले आहे. आज देखील जिल्ह्यातील वाळू माफिया, अवैध धंदे, लूटमार याविरुद्ध आवाज उठविण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करून अवैध धंदे चालकांना अभय देत असल्याचे बोलले जात असून अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात देखील आमदारांना वाचा फुटेल आणि ते जळगाव जिल्ह्यासाठी बोलतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिवेशनाचा परिणाम आणि ते संपल्यावर जळगाव जिल्ह्यातील स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, टीम एलसीबी, उपविभागीय अधिकारी, उपअधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.