⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

गांधी मार्केटला दुकान तर टॉवर चौकात मंदिर फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्यांचे प्रकार सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी १२ लाखांचा डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी आज पुन्हा गांधी मार्केटमध्ये एक दुकान फोडले आहे. तसेच टॉवर चौकाजवळ असलेल्या दत्त मंदिरात देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या मागे लागलेले चोरीचे ग्रहण अद्याप सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी नवीपेठेत राजू अग्रवाल यांच्या घरी डल्ला मारत १२ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले होते. चोरट्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा २ ठिकाणी डल्ला मारला आहे.

टॉवर चौकाजवळ असलेल्या शिवराम लॉज समोरील दत्त मंदिरात शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास एक भुरटा चोर आला होता. मंदिरातील तांब्या आणि दिवा चोरण्याच्या उद्देशाने चोरट्याने मंदिराचा काच फोडण्यासाठी मोठा दगड फेकला. काच फुटून दगड मूर्तीला लागल्याने मूर्ती देखील खंडित झाली. परिसरात असलेल्या काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने धूम ठोकली. तर रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या स्वप्नील संजय भोई यांचे महात्मा गांधी मार्केटला फंकी बॉईज मेन्स वेअर नावाने पहिल्या माळ्यावर कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री ८.४५ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना आपले दुकान फोडल्याचे समजले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवत आत प्रवेश केला. दुकानातून चोरट्यांनी अंदाजे ५७ शर्ट आणि ५३ पॅन्ट चोरून नेल्याचा अंदाज आहे.

पॅन्टची एक गोणी गॅलरीत सोडली

चोरट्यांनी शर्ट पॅन्ट मार्केटच्या मागील बाजूने लंपास केले. सकाळी जीन्स पॅन्ट असलेली एक गोणी मार्केटच्या मागील गॅलरीत पडून होती. काही पॅन्ट बाहेरील बाजूला पडून होत्या. महात्मा गांधी मार्केटमध्ये दिवसभर भुरटे चोर आणि जुगारी फिरत असतात. रात्रीच्या वेळी तर दुकानाबाहेर असलेले लाईट देखील चोरी केल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. दिवसा जुगारी पत्ते खेळत बसलेले असल्याने दुकानदार न नागरिकांना त्रास होत असतो.