जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे याला १५ लाखांची लाच मागून, त्यातील पहिला हप्ता ५ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ACB ने न्यायालयासमोर सादर केलेल्या ‘रिमांड रिपोर्ट’मध्ये अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे केले असून, यामध्ये जळगावातील एका नगरसेविकेच्या मुलाचा थेट संबंध समोर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, तक्रारदार हे बांधकाम कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे ५८ लाख रुपये आणि इतर कामांचे मिळून एकूण ८० लाख रुपयांचे बिल मंजूर करून घ्यायचे होते. हे बिल काढण्याच्या मोबदल्यात अभियंता योगेश अहिरे याने सुरुवातीला तब्बल १८ लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीअंती १५ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले.

शनिवारी, ९ मे रोजी या लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना एसीबीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सापळा रचून अहिरेला रंगेहात पकडले. त्याच्याकडून सॅमसंग S24 अल्ट्रा मोबाईल आणि बलेनो कार जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. “आरोपी अहिरे हा तपासात अजिबात सहकार्य करत नाही. या मोठ्या लाचखोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी त्याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे,” हा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश आर. एस. साळगावकर यांनी आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कोठडीची कारणे
एसीबीने न्यायालयासमोर सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये १० मुद्यांवर ३ दिवसांची पोलिस कोठडी मागितली. ती कोर्टाने २ दिवस मंजुर केली. अहिरेने स्वतःसाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी ७.५० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. हे वरिष्ठ अधिकारी कोण आहे? नगरसेविकेचा मुलगा आशुतोष पाटील आणि आरोपीचे काय संबंध आहेत आणि या व्यवहारात त्याचे नाव का आले, याची समोरासमोर चौकशी करायची आहे. लाचेच्या मागणीशी संबंधित मूळ कागदपत्रे आणि फाइल्स हस्तगत करायच्या आहेत. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे लाच घेतली आहे का? तसेच त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेची आणि आर्थिक गुंतवणुकीची माहिती मिळवणे गरजेचे आहे ही कारणे पोलिस कोठडीसाठी देण्यात आली.
या कारवाईमुळे जळगाव PWD विभागातील इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले असून, पोलिस कोठडीत अहिरे आणखी कोणाकोणाची नावे ओकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







