जळगाव लाईव्ह न्यूज । शेती नुकसानीपोटी मिळणाऱ्या मदतीचे जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शेती नुकसानीपोटी शासनाने मंजूर केलेली आर्थिक मदत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोहोचलेली नाही. तब्बल १० कोटी ११ लाख ५ हजार ५२६ रुपये गेल्या दीड वर्षापासून सरकारी तिजोरीतच पडून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

यामागचं कारण म्हणजे जिल्ह्यातील १२ हजार ६०३ शेतकऱ्यांनी ई-केवायसीसह आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने ही रक्कम अडकून पडली आहे. नुकसान सहन करूनही अनेक शेतकरी मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करत नसल्याने प्रशासनानेही आश्चर्य व्यक्त केले आहे.

राज्य शासनाकडून पिकांच्या नुकसानीपोटी वेळोवेळी आर्थिक मदत जाहीर केली जाते. मात्र प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने ही मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी रावेर, यावल, अमळनेर आणि चोपडा या चार तालुक्यांमध्ये एकही रुपया प्रलंबित नाही. तर पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यांमध्ये सर्वाधिक मदत रखडल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासनाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना मंजूर झालेली मदत मिळू शकेल.







