धक्कादायक : आमदारांच्या घराबाहेर खासदारांबद्दल गलिच्छ लिखाण
जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२२ | काही दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या पाळधी येथील निवासस्थानासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री निषेधाची रांगोळी काढल्याने जिल्ह्यातील राजकारण तापले असता त्यात आता मंगळवारी रात्री जिल्ह्यातील एका खासदारांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मंगळवारी रात्री आमदार सुरेश भोळेंच्या निवास व कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तींनी खासदार उन्मेश पाटलांबद्दल (Unmesh Patil) आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. दरम्यान हे कोणी लिहिले आहे याबाबत अद्यापही समोर आले नसले तरी यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या पाळधी येथील निवासस्थानासमोर पाळधी येथे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचा निषेध म्हणून रांगोळी काढून घोषणाबाजी केली होती. युवासेना व शिवसेनेने त्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून त्यामुळे सेना व भाजपतील (BJP) वातावरण तापले आहे.
अशातच जळगाव (Jalgaon) शहरात अज्ञात व्यक्तींनी आमदार सुरेश भोळे यांच्या रिंगरोड येथील घराबाहेर व क्रीडा संकुलासमोरील कार्यालयाबाहेर भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवल्याने तणाव निर्माण झाला आहे.
भाजपची कारवाईची मागणी
भाजपने या प्रकाराचा निषेध केला आहे. रात्री बाराला टाटा हॅरिअर या चारचाकी वाहनातून येऊन चार अज्ञात महिला व चार पुरुषांनी या ठिकाणी गलिच्छ आणि शिवराळ भाषेत रांगोळीने लिखाण केले आहे. लिखाणातून खासदार उन्मेश पाटील व आमदार भोळे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. अशा अज्ञात समाजकटंकांविरुद्ध गंभीर कारवाई करून सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
हे देखील वाचा :
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- जळगावात ढगाळ वातावरणासह गारठा कायम; आगामी दिवस वातावरण कसे राहणार?