⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

जळगावसह पुण्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 10 दुचाकी जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२४ । शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. यातच जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना छत्रपती संभाजी नगरातून जळगावातील रामानंद नगर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दहा दुचाकी हस्तगत केले. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत असे की, पोलीस अधीक्षकांनी शहरात वाढत्या दुचाकी चोरी रोखण्याच्या सूचना तसेच शहरातील आदर्श नगरातून दि. ४ एप्रिल रोजी धनंजय सुभाष परदेशी यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. दुचाकी चोरतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडन्ूा दुचाकी चोरट्यांचा शोध सुरु होता. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना संशयित हे छत्रपती संभाजी नगर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाला त्याठिकाणी पाठवले. या पथकाने दिलीप रामदास राठोड (वय ३०) याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने चोरलेल्या आठ दुचाकी काढून दिल्या.

तसेच त्याचा साथीदार अनिल चंडौल याला देखील पथकाने ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन अशा एकूण दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी ३ दुचाकी रामानंद नगर तर ३ दुचाकी जिल्हापेठ, १ दुचाकी शहर पोलीस ठाणे तर एक दुचाकी ही पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून चोरी केली असून अन्य दोन दुचाकींचा पोलिसांकडू तपास केला जात आहे. रामानंद नगर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत केल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यातील अंमलदार पोहेकॉ जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी यांच्यासह गुन्हे शोध पथकाला रिवॉर्ड दिला.