⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव शिवसेनेत गेल्या वर्षात न घडलेले ‘शिवसंपर्क अभियान’ने घडविले

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात भाजपच्या नाकावर टिच्चून वर्षभरापूर्वी शिवसेनेने (ShivSena Jalgaon) मनपावर आपली सत्ता प्रस्थापित केली. भाजपचे बंडखोर नगरसेवक शिवसेनेला टेकू देत असताना केव्हाही टेकू खिळखिळा करू लागल्याने सर्वच गडबड बाहेर येऊ लागली. दुसरीकडे शिवसेनेची पॉवर वाढल्याने काही पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आणि गटबाजीचे ग्रहण लागले. जिल्हा संपर्क प्रमुख, पालकमंत्र्यांच्या तोंडावर हाजी हाजी करणारे मागे केव्हा एकमेकांच्या काड्या कोरू लागले हे समजलेच नाही. ‘दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली हैं’ हे जळगावकरांच्या जेव्हा लक्षात येऊ लागले तेव्हा विकासाचे वारे काही वाहणार नाही आणि जळगावचा शिवधनुष्य सत्ताधारी काही पेलू शकणार नाही हे देखील जळगाव शहरवासियांना कळून चुकले. आगामी निवडणुकीत ना भाजपला ना आपल्याला घाल अपक्षाला अशी भिती सेनेच्या मनात निर्माण झाली. अखेर तो दिवस उगवला आणि शिवसंपर्क अभियान जळगावात (ShivSampark Abhiyan) चालून आले. जळगावात दिवसभर आयोजित जंगी कार्यक्रम, सभेला गर्दी दिसून आली नसली तरी पदाधिकाऱ्यांमधील मनमुटावं मात्र दूर झाले. काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न झाला असून हा फंडा यशस्वी झाल्यास ‘आम्ही करून दाखविले’ असे शिवसैनिक अभिमानाने जळगावकरांना सांगू शकतील हे निश्चित.

जळगाव शहरात आजवर असलेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या गटाच्या सत्तेला सुरुंग लावत भाजप नेते आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मनपावर आपला झेंडा फडकावला. सत्तेवर येण्यापूर्वी निवडणुकीत जुमला अवलंबत भाजपने मोठमोठी आश्वासने जळगावकरांना दिली. खिरापत म्हणून वाटावी तशी आश्वासने मोठ्या अपेक्षा लावून असलेल्या जळगावकरांना पचनी देखील पडली. भक्तांनी अंधविश्वास ठेवला आणि आशेचा किरण म्हणून भाजपाला बहुमत दिले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने जळगावला मिळालेल्या निधीच्या घोषणांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. निधी येतोय विकास होणार असे वाटत असताना माशी कुठे तरी शिंकली आणि घोळ झाला. भाजपच्या अंतर्गत राजकारणाने जळगावचा विकास रखडला. १ वर्षात जळगावचा कायापालट झाला मात्र जळगावचा विकासात्मक नव्हे तर अधोगतीकडे जाणारा तो कायापालट होता. रस्त्यांची वाट लागली, उड्डाणपूल रखडले, विकासकामे अपूर्ण राहिली. भाजप नगरसेवक आणि जळगावकरांच्या मनात निराशा उत्पन्न झाली.

हे देखील वाचा : जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध…

सर्वांची खदखद नेमकी शिवसेनेने ओळखली आणि मनपात करेक्ट कार्यक्रम केला. भाजपच्या नाराज नगरसेवकांना हाताशी धरत वर्षभरापूर्वी शिवसेनेने मनपावर भगवा फडकावला. शिवसेनेच्या गोटातून महापौरपदी जयश्री महाजन यांची महापौरपदी तर बंडखोरांचा मोठा गट आणणाऱ्या कुलभूषण पाटील यांची उपमहापौर पदी वर्णी लागली. राज्यात शिवसेनेचीच सत्ता असल्याने जळगावकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. जळगावात विकास होणार, रस्ते चांगले होणार, नागरिकांचा त्रास वाचणार अशा अनेक अपेक्षा जळगावकरांना वाटू लागल्या. शिवसेना मनपात सत्तेत येताच जोमाने कामाला सुरुवात केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या धडक बैठक सुरु झाल्या. जळगावच्या विकासासाठी निधी कसा मिळवायचा यावर विचारमंथन होऊ लागले. निधीची तरतूद झाली, कामांची यादी ठरली, काही कामांना सुरुवात देखील झाली पण मग पुन्हा तेच घडले. भाजपने केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ लागली. कुणाच्या प्रभागात कोणती कामे करायची यावरून मतभेद झाले. सेनेतीलच विशेषतः बंडखोर नगरसेवकांकडून विरोध झाला. गटबाजी उघड झाली.

कुठेतरी मोठी खेळी खेळल्यावर सत्तेत आलेल्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले. मूळ शिवसैनिकांचा गट, स्वीकृतची माळ गळ्यात न पडल्याने नाराज झालेल्यांचा गट, संपर्क प्रमुखांच्या जवळच्या मंडळींचा गट, पालकमंत्र्यांच्या जवळच्या मंडळींचा गट, जेष्ठ नगरसेवकांचा गट, उपमहापौर नवग्रह मंडळींचा गट, महानगरप्रमुखांचा गट असे कितीतरी खुले आणि छुपे गट दिसून आले. १२ गावची १२ मते समोर येऊ लागल्याने एकसंघ वाटत असणाऱ्या शिवसेनेच्या गटात घरचेच भेदी झाले. एकमेकांचे पाय खेचण्यात शहराच्या विकासाला पुन्हा खीळ बसली. दुसरीकडे आपली मनपात सत्ता आल्याने काही जेष्ठ पदाधिकारी हवेत गेले त्यातच महिला मंडळींचे वेगळे. कुणीतरी पक्षप्रवेश झाला आणि इतरांना त्याचा त्रास झाला. महिलांनी उघड नाराजी बोलून दाखवली. जिल्हा संपर्क प्रमुख सावंत आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत देखील गटबाजीचा विषय पोहचला. भर सभेत दोघांनी पदाधिकाऱ्यांना सल्ला वजा समज दिली. सर्व सुरळीत होणार असे वाटत असताना मागे मात्र एकमेकांची उणीदुणी काढणे दुखावलेल्या मंडळींनी सुरूच ठेवले.

हे देखील वाचा : नाथाभाऊंची इच्छा होती कि सुरेशदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे

जळगाव शहराचा विकास काही यंदाच्या पावसाळ्यापूर्वी होणार नसल्याचे चित्र समोर आले. शिवसेनेतील गटबाजीमुळे मनपा अधिकारी देखील बघ्याच्या भूमिकेत निवांत झाले. एकंदरीत सोशिक जळगावकर शिवसेनेला देखील सहन करणार हे ठरले. जळगाव महत्वाचा जिल्हा असून आपली मनपावर पकड मजबूत असल्यास जिल्हापरिषद, विधान परिषद आणि विधानसभेला त्याचा फायदा नक्की होणार हे वरिष्ठांना माहिती असले तरी आपलेच लेकरू आपले ऐकत नसल्याने करणार तरी काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. वरिष्ठांनाच काय तर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील उरली सुरली आशा सोडून दिली. जळगावचे काहीच होऊ शकत नाही म्हणून सर्वच हळूहळू थंड बस्त्यात जाऊ लागले. निवडणुका समोर ठेवत शिवसेनेने राज्यस्तरावर शिवसंपर्क अभियान हाती घेतले. जळगावात देखील त्याचे आयोजन करण्यात आले.

शिवसंपर्क अभियानच्या निमित्ताने जळगाव भगवे झेंडे आणि बॅनरने सजले, मनपाकडून त्याची परवानगी घेतली नाही किंवा बॅनरवर परवानगीचे क्रमांक टाकले नाही तो भाग वेगळा. शुक्रवारी सकाळी मोटारसायकल रॅली, धर्मवीर चित्रपटाचे, ठिकठिकाणी शाखा उदघाटन, सायंकाळी सभा असे भव्य नियोजन होते. सभेला निवडक कार्यकर्त्यांची गर्दी आणि मोजकेच पदाधिकारी होते. जुने जाणते नाराज कार्यकर्ते बाहेर नाराजी व्यक्त करताना दिसून आले. सभेला उपस्थित महिला देखील मूळ शिवसैनिकच नव्हत्या. वाजतगाजत आल्या आणि काही वेळात एकामागोमाग एक बाहेर पडल्या. सभागृहातील खुर्च्या रिकाम्या दिसू लागल्या. शिवसंपर्क अभियानाचे आताचे नियोजन काही अंशी चुकले असले तरी या अभियानाचा एक महत्वाचा फायदा मात्र झाला. दिवसभर सर्व पदाधिकारी, गटबाजीतील सदस्य सोबत राहिल्याने कुणाचे कुठे चुकते याचा अचूक अंदाज वरिष्ठांना घेता आला. काही स्थानिक जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यात मध्यस्थीची भूमिका घेतली.

हे देखील वाचा : कमळाला चिखलात लोटून शिवधनुष्य पेलायला निघालेल्या उपमहापौरांचा टेकूच निखळला

सभा आटोपली आणि मग सुरु झाला खरा खेळ. गेल्या वर्षभराचा आढावा घेत सर्व गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. नाराजांची नाराजी दूर करीत त्यांना योग्य सन्मान, निधीचे आश्वासन मिळाले. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह इतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मनी असलेला रोष दूर करण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यशस्वी ठरले. रात्री उशिरा सुरु झालेले मनोमिलनाचे प्रयत्न पहाटे संपले. तूर्तास हा प्रयत्न सफल होताना दिसत असला तरी पुढे जळगावकरांना त्याचा कितपत फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जळगावकरांना शिवसेनेकडून लागून असलेली आशा या मनोमिलन कार्यक्रमानंतर काहीशी पल्लवित झाली आहे. सर्व पदाधिकारी एकत्र आल्याने जिल्ह्यात आणि शहरात येणाऱ्या काळात शिवसंपर्क अभियान देखील जोमाने राबविले जाईल. शिवसेना तळागाळात पोहचवीत ‘मनात राम, हाताला काम हेच आमचे हिंदुत्व’ हे शिवसेना येणाऱ्या काळात सत्यात उतरवेल कि नाही हे निश्चित नसले तरी ‘मनात राम आणि जळगावकरांच्या चेहऱ्यावर समाधान’ इतके जरी केले तरी पुढची टर्म त्यांचीच असेल हे मात्र निश्चित.