⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

वाळूमाफियांवर एमपीडीए अंतर्गत खटले दाखल करा : आ.खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ते अपूर्णावस्थेत आहे. जवळपास एक लाखावर लोकसंख्येला त्यामुळे भरपूर त्रास होत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. तरीही केवळ ठेकेदाराचे भले होण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जाते. जिल्ह्यात वाळूमाफियांनी गोंधळ घातलेला आहे. मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होत आहे. प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाल्यासारखे चित्र असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला.

त्यांची सोडवणूक करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना माहिती दिली. जळगाव-अजिंठा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल व जळगाव ते अजिंठापर्यंतच्या महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावरील सर्कलच्या आजूबाजूला अतिक्रमण झालेले आहे. गेल्या आठवड्यात तेथे अपघात झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर लक्ष द्यावे, अशी विनंती खडसेंनी केली. या संदर्भात मंगळवारी तातडीची बैठक घेऊन सूचना देण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले.

कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात, असे म्हटले जाते. वाळूतस्करी का थांबत नाही. वाळूतस्करी करणारे जप्त करण्यात आलेले ट्रक, ट्रॅक्टर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठवा, त्यांना एक, दोन महिने जप्त करून ठेवा, वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत खटले दाखल करा. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई केल्यास काही प्रमाणात प्रतिबंध लागू शकतो. मुक्ताईनगर तालुक्यात त्यांनी स्वत: तेथील तहसीलदारांना पाठवले होते. तहसीलदार जाईपर्यंत वाळूतस्कर फरार होऊन गेले. यंत्रणाच अशी कमजोर असेल, माहिती देत असेल तर प्रशासन हतबल होतं. वाळूमाफियांवर नियंत्रण आणले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

जिल्ह्यात रेशन धान्याचा काळाबाजार
जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य बाहेर जाते. गेल्या आठवड्यात रेशनचा २५ टनाचा ट्रक भुसावळ पोलिस उपअधीक्षकांनी नशिराबादजवळ पकडला. पुढे काय झाले? कोणताही दंड झाला नाही. जे धान्य रेशनच्या दुकानात येते, ते धान्य मोफत मिळते, रेशनचे धान्य राजरोसपणे ग्राहक विकतो. विकलेले धान्य एकत्रित करण्यासाठी गावोगावी रिक्षा लावल्या जातात. एकत्रित धान्य गोदामात टाकून बाहेरील राज्यात पाठवले जाते. हे एक रॅकेट जिल्ह्यात आहे. पोलिस प्रशासन, पुरवठा विभागाने अधिक लक्ष द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. सीसीटीव्ही कॅमेरे लावून प्रतिबंध करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले.