ठाकरे गटाला दिलासा ; ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत कोर्टाने पालिकेला दिले ‘हे’ आदेश

ऑक्टोबर 13, 2022 4:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

court jpg webp

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.

ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून एखादा कर्मचारी राजीनामा देऊन निवडणूक लढवत असेल तर काय अडचण आहे असा सवाल न्यायालयाने पालिकेला विचारला. त्यावर सविस्तर उत्तर देण्याचे निर्देशही दिले. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आम्हाला हस्तक्षेप करावा लागत असल्याचं सांगत न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल दिला. महापालिकेने ऋतुजा लटके यांच्या राजीनामा सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now