शिंदे गटाच्या नगरसेवकांना मिळाला भरगच्च निधी : रस्त्यांची कामे लागणार मार्गी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । शिंदे गटाच्या नगरसेवकांना आपल्या वार्डात कामे करून घेण्यासाठी भरगच्च निधी मिळाला आहे.महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक नगरसेवक वॉर्ड व प्रभागात कामांसाठी धडपड करीत आहे यातच आता शिंदे गटाच्या चार नगरसेवकांच्या प्रभागात पाच रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने ३ कोटी ३४ लाख ६१ हजार १३६ रुपयांची निविदा काढली आहे.

अॅड. दिलीप पाकेळे यांच्या प्रभाग क्र. १ मध्ये के.सी. पार्कमधील रस्ते डांबरीकरणासाठी ८१ लाख १ हजार ८७९, प्रवीण कोल्हे यांच्या प्रभाग 3 मध्ये ज्ञानदेव नगर, श्रावण नगर तसेच ११९ मधील या दोन रस्त्यांसाठी ४८ लाख ९२ हजार ७३४ व ६५ लाख ४८ हजार १३४ अशा दोन निविदा आहेत

गणेश सोनवणे यांच्या प्रभाग क्र.१९ मध्ये सुप्रीम पोलिस लाईन या कॉलनी, पोलिस भागातील रस्ते डांबरीकरणासाठी ५६ लाख ३२ हजार ४० तर चेतन सनकत यांच्या प्रभाग क्र. ४ मधील काट्याफाईल, गुरुनानकनगर, बळीराम पेठ या भागातील रस्ते कॉक्रिटीकरणासाठी ८२ लाख ८६ हजार ३४९ रुपये किमतीची निविदा काढण्यात आलेली आहे. पाच कामांसाठी ३ कोटी ३४ लाख ६१ हजार १३६ रुपयांची निविदा काढण्यात आली आहे .

१६ मार्चपर्यंत अर्ज विक्री व निविदा दाखल करण्याची मुदत आहे. १७ मार्च रोजी ही निविदा उघडली जाणार आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने ही निविदा ९ मार्च रोजी प्रसिद्ध केली आहे.

महासभेने ठराव केलेल्या ६२ कोटीच्या निधीतून १०६ रस्त्यांच्या कामांची यादी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविली आहे. मध्यंतरी विधानसभेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या कामांना ब्रेक लागला होता.१०० कोटीच्या मंजूर निधीतून ३८ कोटीची कामे आधी झाली असून उर्वरित कामांना आता शासन आदेशाची प्रतीक्षा आहे.