शेंदुर्णी येथे तहसील कार्यालय व रेल्वे मालधक्का झालाच पाहिजे !
जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : अप्पर तहसील कार्यालय व रेल्वे मालधक्का शेंदुर्णीतच व्हावा या मागणीसाठी आज शेंदुर्णी नगरंचायतीच्या प्रांगणात सर्वपक्षीय नेते व नागरीकांचे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विजया खलसे तर प्रमूख उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरूड, माजी सरपंच सागरमल जैन,डॉ. किरण सूर्यवंशी,उपनगराध्यक्ष गणेश पाटील, सुधाकर बारी,भाजप नेते गोविंद अग्रवाल,उत्तमराव थोरात, अमृत खलसे नगरपंचायतीचे सर्व नगर सेवक, विविध संस्था पदाधिकारी व नागरिकांची उपस्थीती होती.
नगराध्यक्षा सौ. विजया खलसे यांनी आपल्या प्रास्ताविकात शेंदुर्णी येथे सर्व शासकिय कार्यालये व रेल्वे माल धक्का मंजूर करण्यात यावा यासाठी सभा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी शेंदुर्णी गावाची भौगोलिक परिस्थिती व बाजार पेठ , लोकसंख्या याचा विचार करून शेंदुर्णी तालुका घोषित करून सर्व शासकिय कार्यालये येथे निर्माण करण्याची मागणी केली.
भाजपचे नेते गोविंद अग्रवाल यांनी शेंदुर्णी येथे ब्रिटिश काळापासून रेल्वे माल धक्का होता तो मिळावा तसेच तालुक्यातील सर्वात मोठे लोकसंख्येचे शहर व व्यापारी पेठ लक्षात घेऊन शेंदुर्णी येथे नियोजित अप्पर तहसिल कार्यालय मंजुर करण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी अमृत खलसे, उत्तम थोरात, सागरमल जैन यांनी आपल्या भाषणात शेंदुर्णी शहरातील व्यापार पेठ , शैक्षणिक संस्था,सहकारी संस्था, ऐतीहासिक वारसा लक्षात घेऊन शेंदुर्णी तालुका निर्मिती व्हावी अशी मागणी केली यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेंदुर्णी करांना सापत्न वागणूक मिळत असल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला व आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे