⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

शेळगाव बॅरेज भाग १ : शंभर टक्के पाणी वापराची हमी असलेला शेळगाव बॅरेज

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । शेळगाव बॅरेजचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. बॅरेजचे १८ लोखंडी महाकाय दरवाजे (५५ फूट उंची म्हणजे ५ मजली इमारत एवढी उंची असलेले) लावले गेले आहेत. आता त्यांचे आर्म जोडणी आणि प्लेटांमधील गॅपमध्ये वेल्डिंगचे काम सुरू आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये बॅरेजमध्ये पाणीसाठा होईल. या प्रकल्पाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हा बॅरेज दरवर्षी १०० टक्के भरेल आणि त्यातील वापरण्यायोग्य पाणीसाठ्याचा १०० टक्के वापर करता येईल. यावलसह जळगाव आणि भुसावळ तालुक्यात पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि उद्योगासाठी शेळगाव बॅरेज आता नवा जलस्त्रोत ठरणार आहे. तब्बल २४ वर्षे लांबलेला-लांबविलेला हा प्रकल्प साकारला जातोय.

मूळ आराखड्यानुसार बॅरेजमध्ये ४.५ टीएमसी (१२७.५२९ दशलक्ष घनमीटर) पाणी साठा होईल. प्रत्यक्षात ५ टीएमसी पाणी साठा असेल. हा पाणीसाठा दरवर्षी पूर्णतः उपलब्ध होईल कारण प्रकल्प परिसरात पडणारा पाऊस आणि तापीतून वाहून जाणारे पुराचे पाणी हे नियोजनात गृहित धरल्यापेक्षा किती तरी जास्त आहे. शिवाय, या प्रकल्पात जेवढा पाणीसाठा होईल त्याचा वापर पुरेपुर करता येणार आहे. मृतसाठा हा ०.५ टीएमसी जरी गृहित धरला तरी प्रत्यक्ष ४.५ टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. हेच शेळगाव प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

Shelgaon Barage

शेळगाव बॅरेजमधील ३.०९२ टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरले जाईल. यावल तालुक्यातील १९ गावातील ९,१२८ हेक्टर शेतीला पाणी उपलब्ध होईल. हा जलस्त्रोत लक्षात घेऊन आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी यावल तालुक्यातील उपसा सिंचन योजना मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे थेट प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार सौ. लताताई सोनवणे यांचे सहकार्य त्यांनी घेतले आहे. उपसा सिंचन योजना वेळीच आणि गुणवत्ता पूर्ण कामे करून उभारल्या तर यावल तालुक्यातील शेतकरी बारमाही पिकांचे नियोजन करून संपन्न होईल. हेच स्वप्न आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांनीही पाहिले होते. त्यांनीही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. शेळगाव बॅरेजसाठी निधी उपलब्ध करून देण्यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचाच सिंहाचा वाटा आहे. गडकरी यांनी सन २०१८ मध्ये बळीराजा जलसंजीवनी योजनेत शेळगाव प्रकल्पाचा समावेश केला. टप्प्याटप्प्याने आजपर्यंत निधीही दिला. त्यामुळेच सन २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊ घातलेला आहे. प्रकल्पाची सर्व कामे नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे.

शेळगाव प्रकल्पासाठी खर्च आणि निधी याचे थोडे नियोजनही लक्षात घेऊ. या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी एप्रिल १९९९ मध्ये मिळाली. तेव्हा नियोजित खर्च होता १९८ कोटी रूपये. सध १९९९ ते २०१६ या १७ वर्षात प्रकल्पाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष दिले नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये शेळगाव बॅरेज प्रकल्पाला प्रथम सुधारित मान्यता मिळाली. या सुधारित आराखड्यात बुडीत क्षेत्रातील रस्ते आणि ४ पुलांची उभारणी याचाही विचार केला गेला. त्यामुळे खर्च पोहचला ६९९ कोटींवर. सन २०१८ मध्ये गडकरींनी बळीराजा जलसंजिवनी योजनेत या प्रकल्पाचा समावेश केला. सप्टेंबर २०१९ मध्ये दुसरी सुधारित मान्यता मिळाली. खर्च पोहचला ९६८ कोटींवर. राज्याच्या वित्त विभागाने सुद्धा डिसेंबर २०१९ मध्ये (सन २०१६/१७ च्या दरसूचीनुसार) ६९९ कोटी खर्चाला मान्यता दिली. आता याच निधी नियोजनानुसार काम पूर्ण होत आहे. गडकरी वगळता इतर कोणताही नेता असे म्हणू शकत नाही, ‘मी शेळगाव प्रकल्पासाठी निधी आणला !’

shelgaon-barage

शेळगाव बॅरेजमधून पिण्यासाठी ०.५९६ टीएमसी पाणी मिळेल. उद्योगासाठी ०.२४३ टीएमसी पाणी मिळेल. हे पाणी भुसावळ आणि जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतींना उपयोगात आणता येईल. म्हणजेच शेळगाव बॅरेज त्याच्या नियोजित उद्दिष्टाला साध्य करेल. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना केळी, ऊसाकरीता बारमाही, कपाशी मिरचीसाठी दोन हंगाम, खरीप ज्वारी, कडधान्ये, तेलबिया, रब्बी गहू, ज्वारी, मिरची आणि उन्हाळी भुईमूग, चारापीके व भाजीपालासाठी पाणी मिळू शकेल. शेळगाव बॅरेज परिसरातील जमिनीत मातीसोबत रेतीचे थर आहेत. त्यातून पाण्याचे स्त्रोत शेतकऱ्यांच्या विहिरींपर्यंत पोहचतील. हा अदृश्य लाभ शेतकऱ्यांना मिळेल. अशा पद्धतीने शेळगाव बॅरेज प्रकल्प यावलसह जळगाव व भुसावळ तालुक्यांसाठी वरदान ठरू शकेल.

या प्रकल्पाच्या प्रकल्पस्थळी सद्यस्थिती पाहण्यासाठी भेट दिली असता याबाबत प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार यांनी खालील प्रमाणे माहिती दिली.
१) प्रकल्पाला किमान ५ मजले उंचीचे (५५ फुट) लोखंडी गेट आहेत.
२) हे गेट वर-खाली करण्यासाठी आठ हात (आर्म) चे लोखंडी सांगाडे आहेत.
३) गेटसाठी जपान वरुन आणलेल्या बेरिंग, किर्लोस्करच्या मोटारी अशा प्रकारचे अद्यावत तांत्रिक साहित्य वापरण्यात येत आहे.
४) वेल्डींगचे काम केल्यानंतर त्याची एक्स-रे तपासणी होत आहे.
५) प्रकल्पासमोर तापीनदीवर जळगाव-शेळगाव-बामणोद रस्त्यावर जिल्ह्यातला तापी नदीवर अजून एक उंच पूल उभारला जात आहे.
६) प्रकल्पासमोरील पूल पूर्ण झाला तर जळगावची यावल, मध्यप्रदेशकडील रस्ता संपर्क वाढेल. जळगाव यावल अंतर किमान २० किलोमीटरने कमी होईल.
७) प्रकल्पाच्या कामात कडगावजवळ उंच पूल, अंजाळे गावाजवळ उंच पूल, मोर नदीवर उंच पुलांचे बांधकामही सुरू आहे.

shelgaon barage1

प्रकल्पाची १००% टक्के उपयुक्तता…
शेळगाव बॅरेजमधील पाणी १०० % सिंचन, पिणे आणि उद्योगांसाठी वापरले जाईल. हा प्रकल्प दरवर्षी पूर्णतः भरेल. कारण तापीतून वाहून जाणारे पाणी साठा होण्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी उपलब्ध आहे. प्रकल्प परिसरात वॉटर स्पोर्टस्, जल पर्यटन आणि रिसोर्ट वा फार्म हाऊस सारखे पर्यटकांना आकर्षून घेणारे व्यावसायिक प्रकल्प होऊ शकतील. हा प्रकल्प खऱ्या अर्थाने परिसराला जलसंजीवनी देईल.
– प्रकाश पाटील, प्रकल्प तांत्रिक सल्लागार

(शेळगाव बॅरेज भाग २ – जळगाव जिल्ह्यातील सिंचन विकासातील शुक्राचार्य आणि शेतकरी अहिताचे कंगोरे)
लेख व छायाचित्रे : जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, जळगाव