⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

गंभीर : भुसावळ-जळगाव दरम्यान रेल्वेतून युवती बेपत्ता, दहा दिवस होऊनही शोध लागेना

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या बरौनी अहमदाबाद एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेतून युवती बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १८ रोजी घडली असून, पोलिसांनी भुसावळ, जळगावसह विविध ठिकाणी पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज व जिल्हाभरातील पोलीस स्टेशनला मुलीचे फोटो पाठवूनही युवतीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे आई वडिलांसह पोलिसही चिंतेत पडले आहेत. अंजली शिवमोहन शाह असे बेपत्ता युवतीचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील बांदा जिल्ह्यातील पैलानी तालुक्यातील ग्राम शिंदण गावातील रहिवासी शिवमोहन शाहू हे १८ फेब्रुवारी रोजी (गाडी क्र. १९४८४, बोगी क्र. एस ४) बरौनी अहमदाबाद एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशहून सुरत येथे जात होते. बैरोनीहून सकाळी साडेसात वाजता निघालेली ही गाडी, भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री ३ वाजता आली. भुसावळला गाडी आल्यानंतर या युवतीने आपल्या आईला बाथरूमला जाऊन येत असल्याचे सांगितले. मात्र, बराचवेळ उलटूनही बाथरूमला गेलेली मुलगी न आल्यामुळे युवतीच्या आईने पती शिवमोहन शाह यांना झोपेतून उठवून, मुलीचा धावत्या गाडीतच शोध लागत नसल्याचे सांगितले.

गाडीतील सर्व डबे व बाथरूममध्ये शोध घेतला. मात्र कुठेही युवती आढळून न आल्याने, आई-वडिलांनी गाडीतच रडायला सुरुवात केली. गाडीतील पोलिसांनीही गाडीमध्ये सर्वत्र शोध घेऊनही मुलीचा कुठेही तपास न लागल्यामुळे, हा गुन्हा जळगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.

सर्वत्र शोध घेऊनही युवतीचा शोध लागेना

तक्रारीनंतर लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्टेशन व जळगाव रेल्वे स्टेशन व जळगाव रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, जळगाव ते भुसावळ दरम्यान रेल्वे रुळ परिसराचीही पाहणी केली. इतकेच नव्हे जळगाव शहर, तालुका व जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांमध्ये मुलीचा फोटो पाठवून, याबाबत चौकशी केली आहे. मात्र, तरीदेखील युवतीचा कुठेही शोध लागलेला नाही.

आवाहन!

बैरोनी- अहमदाबाद एक्स्प्रेसमधून १८ रोजी मध्यरात्री भुसावळ ते जळगाव दरम्यान युवती बेपत्ता झाल्याची तक्रार युवतीच्या पालकांनी दिली आहे. पोलिसांतर्फे सर्वत्र या युवतीचा शोध सुरू असून, कुठेही मुलगी दिसून आल्यास नागरिकांनी जळगाव रेल्वे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा. असे आवाहन तपासधिकारी रेल्वे लोहमार्ग पोलीस सचिन भावसार यांनी केले आहे.