जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२६ । आखाती देशांमधील तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याने बाजारावर दबाव वाढला होता. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात युद्धविरामाची घोषणा करताच आज बुधवार, ८ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली.

अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर जागतिक तणाव कमी झाल्याचे संकेत मिळाले, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजाराने दमदार सुरुवात केली.

आज सकाळी भारतीय शेअर बाजार चमकून उठला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या रेघा हिरव्या रंगात न्हाऊन निघाल्या. सुरुवातीच्या व्यवहारात Sensex तब्बल २,७०० हून अधिक अंकांनी उसळला, तर निफ्टी-50 ८०० अंकांनी वाढली होती मात्र यानंतर पुन्हा मोठी वाढ झाली. सकाळी सुमारे ११.१५ वाजता सेन्सेक्स सुमारे २,९३० अंकांनी वाढून ७७,५४८ च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी जवळपास ८७० अंकांच्या वाढीसह २३,९९६ वर पोहोचला.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या चलनविषयक धोरण समितीने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात स्थैर्याचा संदेश गेला. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनीही या तेजीला अधिक बळ दिले.
विशेष म्हणजे, आयटी आणि फार्मा क्षेत्र वगळता बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक तेजीत होते. निफ्टी स्मॉलकॅप-१०० आणि मिडकॅप-१०० निर्देशांकांमध्येही मोठी वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे व्यापक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.












